नाशिक । कुंदन राजपूत

निओ मेट्रोच्या चर्चेमुळे कधीकाळी नाशिक शहरात धावणार्या ट्रामच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. ब्रिटीश काळात सन 1889 साली नाशिकमध्ये ट्रामसेवा सुरू झाली. त्यावेळी देशाची राजधानी असलेले कलकत्ता व आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपाठोपाठ नाशिक शहरात सुरू झालेली ही भारतातील तिसरी ट्रामसेवा होती. विशेष म्हणजे ही ट्राम इंजिनद्वारे नाही तर घोडे ओढून नेत असत. दोन डबे असलेली ही ट्राम चार घोडे ओढायचे. एक आणा तिकिटात ही ट्राम नाशिककरांना सफरीचा मनमुराद आनंद देत असे....

मेनरोडला जिथे सध्या महापालिकेच्यानाशिक पूर्व विभागाचे मुख्यालय आहे त्या ठिकाणच्या जागेत ट्रामचे स्टेशन आणि त्यासाठी लागणार्या घोड्यांची पागा होती. त्या जागेवरून सध्याच्या मेनरोड, भद्रकाली मार्केट, घासबाजार, फाळके रस्त्यामार्गे ही ट्राम नाशिकरोड रेल्वे स्टेशनकडे जात असे. ट्रामचे तिकिट एक आणा होते.

घोडे ट्राम ओढून दमायचे. पुर्वी विजय ममता टॉकिज असलेल्या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली बारव होती. तेथील विहिरिला भरपुर पाणी असायचे. तेथे ट्राम ओढण्यासाठी घोडयांचा छोटा तबेला होता. या ठिकाणि ट्रामला नव्या दमाचे घोडे जुंपले जायचे व थकलेले घोडे विश्रांतीसाठी बांधले जायचे.

जवळपास 27 वर्ष घोडे असलेलि ट्राम नाशिकच्या रस्त्यांवर धावली. नंतर सन 1917 पासून घोडे बंद करून पेट्रोलवर चालणारे इंजिन या ट्रामला बसविण्यात आले. नाशिक ते नाशिकरोड रेल्वे स्टेशन अशा सरळ रस्त्याच्या एका बाजूने हे ट्रामचे रूळ टाकलेले होते. त्यावर नविन ट्राम धावायची.

त्यावेळी भारतातल्या इतर ट्राम सेवा डिझेल इंजिनावर चालत होत्या. पेट्रोलचे इंजिन नाशिकला पहिल्यांदा वापरले गेले. जवळपास 44 वर्ष ट्रामने नाशिककरांना सुखद प्रवासाचा आनंद दिला. सन 1933 साली ही ट्रामसेवा बंद झाली. मेनरोडला टर्मिनसच्या जागेत सध्या अस्तित्वात असलेली नगरपालिकेची दगडी इमारत इमारत सन 1936 साली बांधण्यात आली.

नाशिकरांसाठी ट्रामचा प्रवास कुतहुलाचा विषय असायचा. एक आणा तिकिट होते. ट्राम बंद झाल्यानंतर काही वर्षांनी भद्रकाली बस स्टँडच्या बांधकामासाठी या ट्रामचे रेल्वे ट्रॅक उखडून टाकले जात असल्याने दृष्य माझ्या लहानपणी मी पाहिले. ते अजूनही आठवते.
मधुकर (आण्णा) झेंडे, माजी जनसंपर्क अधिकारी. महापालिका

1925 च्या दरम्यान कुसुमाग्रजांनी या ट्रामने प्रवास केला. तेव्हा त्याचे तिकीट दोन आणे म्हणजे बारा पैसे इतके होते. ‘नाशिक - तेव्हाचे’ या लेखात कुसुमाग्रजांनी ट्रामबद्दल आस्थेने लिहिले आहे. ते लिहितात, ‘स्वार्या पुरेशा भरल्या की ट्राम निघायची. घंटेचा खणखणाट करीत ती तेथून मेनरोडने आणि पुढे घासबाजाराजवळ गावाबाहेर पडायची. सुमारे अर्ध्या तासात ती स्टेशनापर्यंत जायची. नाशिक, नाशिकरोडमध्ये तेव्हा कोठेच वस्ती नसल्याने मध्ये कोठे थांबण्याची गरज नसे. तरीही रस्त्यावर कोणी हात दाखवला तर सारथी गाडी थांबवायचा आणि दोन आण्यांची दौलत कंपनीला मिळवून द्यायचा.