बालिकेच्या भेटीसाठी माऊलीची आस; तीन दिवस उलटूनही शोध नाही

बालिकेच्या भेटीसाठी माऊलीची आस; तीन दिवस उलटूनही शोध नाही

नाशिक । प्रतिनिधी

गेली तीन दिवसांपासून ती सिव्हीलच्या गेट परिसरातच बसून असते, कधी हंबरडा तर कधी मुक आस्त्रु ढाळत असते, येणार्‍या जाणार्‍यांना मुलीचा फोटो दाखवून तीला पाहिले असल्यास सांगण्याची विनंती करते, लवकरच आपली व मुलीची भेट होईल अशी आस लाऊन ही माऊली तीच्या वाटेकडे डोळे लावून बसल्याचे जिल्हा रूग्णालयाच्या प्रवेशद्वारातले रोजचे चित्र आहे...

जिल्हा शासकीय रूग्णालयातून रूग्णाच्या नातेवाईकाची दिड वर्षाच्या बालिकेचे अपहरण झाल्याच्या घटनेला तीन दिवस उलटूनही अद्याप बालिका तसेच अपहरकर्त्याचा शोध लागलेला नाही. बाळंतपणासाठी बहिणीला दाखल करण्यासाठी आलेल्या महिलेच्या दीड वर्षाच्या बालीकेस भर दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयातून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली होती.

गौरी भोला गौड (दिड वर्ष, रा. ठाणे, मुंबई) असे अपहरण झालेल्या बालिकेचे नाव आहे. चोरीला गेलेली गौरी ही बालिका मूळची उत्तर प्रदेशातील असून, आई वडिलांसमवेत ठाण्यातील रबाले परिसरात राहाते. तिची मावशी अंबड परिसरात राहावयास आहे.

तिला प्रसूतीसाठी दाखल करावयाचे असल्याने या बालिकेला घेऊन तीची आई संगीता ही शनिवारी सकाळी 11.30 च्या सुमारास जिल्हा रुग्णालयात आल्या होत्या. तेव्हापासून ते दुपारी एक पर्यंत त्यांचा कागदपत्र जमवण्यात वेळ गेला.

दरम्यान सर्व कागदपत्रे जमवुन अखेरीस बहिणीला प्रसुती कक्षात दाखल करण्याचे प्रयत्न सुरू असताना त्याचवेळी मुलगी झोपल्याने संगिता यांनी तिला प्रसूती कक्षाबाहेर झोपवले व तेथे बसलेल्या व्यक्तीस बालिकेकडे लक्ष देण्यास सांगीतले.

दुपारी सव्वा ते दीडच्या सुमारास त्या प्रसुती कक्षा बाहेर आल्यानंतर त्यांना मुलगी दिसली नाही म्हणून सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ती आढळून आली नाही. अखेरीस रूग्णालय प्रशासनास विनंती करून रुग्णालयातील सिसिटीव्ही तपासले असता ज्या व्यक्तीस मुलीकडे लक्ष देण्यास सांगीतले तोच व्यक्ती मुलीला खांद्यावर झोपवून घेऊन जाताना आढळला.

याप्रकरणी संगिता गौड यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान सरकारवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकासह आणखी दोन पथके तपासासाठी तैनात करण्यात आली आहे. तर, शहर गुन्हे शाखेची पथकेही समांतर तपास करीत आहेत.

परंतु सीसीटिव्ही कॅमेरात संशयित कैद झाला असताना तसेच एका पायाने अधू असतानाही अद्याप तो पोलीसांच्या हाती न लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com