सावधान! व्हाट्सॲप पिंक आणि फ्री 'नेटफ्लिक्स'च्या नावाखाली फेक लिंक्स व्हायरल

सावधान! व्हाट्सॲप पिंक आणि फ्री 'नेटफ्लिक्स'च्या नावाखाली फेक लिंक्स व्हायरल

नाशिक | प्रतिनिधी

सोशल मीडियात गेल्या आठवड्याभरापासून व्हाट्सॲपवर दोन प्रकारच्या लिंक्स व्हायरल होत आहेत. या लिंकमध्ये व्हाट्सॲप पिंक - हे डाउनलोड करा आणि हिरवे असलेले तुमचे व्हाट्सॲप गुलाबी करा. तसेच फ्री नेटफ्लिक्स - हे डाउनलोड करा आणि नेटफ्लिक्स तसेच अन्य ओटीटी मोफत मिळवा. यासोबतच या लिंक्स इतरांना शेयर करण्यासही सांगितले जात आहे...

या दोन्ही लिंक्स फेक असून, त्यावर क्लीक केल्यास एक भलतेच ॲप आपोआप मोबाईल मध्ये डाउनलोड होते. "Online Stream" या नावाचे ॲप डाउनलोड होते. हे ॲप म्हणजेच एक प्रकारचा मालवेयर असल्याचे सायबर तज्ञ दावा करत आहेत. त्यामुळे या लिंक ओपन करू नये असे आवाहन सायबर तज्ञांनी केले आहे.

हे ॲप युजरचा मोबाईल आणि त्यात असलेले व्हाट्सॲप 'हॅक' करण्यासाठी वापरले जाते. हे ॲप मोबाईल मध्ये डाउनलोड झाल्यावर वरील फेक लिंक्स आपोआप व्हाट्सॲप ग्रुप मध्ये पाठवल्या जातात आणि तेही युजरच्या नावाने. काही कळायच्या आतच हे ॲप मोबाईलमधील व्हाट्सॲपला नियंत्रित करू लागते.

या 'Online Stream' ॲपमुळे मोबाईल मधील बँकिंग ॲप सुद्धा धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे करा

१) इंटरनेटवर कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये.

२) अशा प्रकारे कोणत्याही अनोळखी लिंक्सवर क्लीक करू नये.

३) जर चुकून क्लीक झाले असल्यास त्वरित आपल्या मोबाईलच्या सेटिंग्स मध्ये जाऊन 'Online Stream' ॲप डाउनलोड झाले आहे का ते तपासावे.

४) जर 'Online Stream' ॲप डाउनलोड झाले असेल, तर ते लगेच Uninstall करावे.

Settings -> App Manager -> 'Online Stream' -> Uninstall

Settings -> App Manager -> Mobile Browser -> Clear History -> Clear Cache

५) तसेच व्हाट्सॲप चॅटमधून ती लिंक डिलीट करून टाकावी.

हा मालवेयर सध्या केवळ अँड्रॉइड मोबाईलवरच हल्ला करत आहे. जर कोणत्याही व्हाट्सॲप ग्रुपमध्ये अशी लिंक कोणी टाकत असेल तर त्या व्यक्तीच्या मोबाईल मध्ये हा मालवेयर आला असण्याची शक्यता आहे. त्या व्यक्तीस त्वरित संपर्क करून 'Online Stream' ॲप काढून टाकण्यास सांगावे.

ओंकार गंधे (सायबर सुरक्षा तज्ज्ञ विश्लेषक)

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com