नाशिक । प्रतिनिधी

गावठाण जमाबंदी प्रकल्प योजनेत भारतीय सर्व्हेक्षण विभागामार्फत ड्रोनच्या सहाय्याने गावठाणातील मिळकतींचे सर्वेक्षण करून गावठाणातील मिळकतींचा डिजिटाईजड् नकाशा तयार करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने ड्रोनच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या गावठाण मोजणीसाठी निवडण्यात आलेल्या गावांचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात ड्रोनद्वारे गावठाण मोजणी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा सूचना विज्ञान केंद्र अधिकारी राजेश साळवे, नगर रचनाकार दिपाली पाटील, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख महेश शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, निवड करण्यात आलेल्या एक हजार ४२८ गावांची २०११ नुसार नमुना नंबर ८ ची माहिती पीडीएफ व एक्सेल स्वरूपात टप्प्या टप्प्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला उपलब्ध करून देण्यात यावी.

जेणे करून ड्रोनद्वारे सर्वेक्षण करतांना अडचणी निर्माण होणार नाहीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने वेळेत काम पूर्ण होण्यासाठी मदत होईल.

या सर्वेक्षणासाठी गावांचे नियोजन करतांना प्रत्येक गावात सर्वेक्षणाच्या अनुषंगाने कोणत्या स्वरूपाचे काम सुरू आहे, याची सविस्तर माहिती मिळेल अशाप्रकारे आराखडा तयार करण्यात यावा.

तसेच तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ड्रोनद्वारे गावठाण मोजणीचे काम करत असतांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वयकाच्या भूमिकेतून जबाबदारी पार पाडावी.

तसेच ही मोजणी करतांना भूमि अभिलेख विभागास गावपातळीवर काही अडचणी आल्यास त्याबाबत संबंधित यंत्रणेची मदत घेण्यात यावी. तसेच ड्रोनद्वारे गावठाण मोजणीची प्रक्रीया सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने पार पाडावी, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.