नाशिकरोड |प्रतिनिधी

ड्रेनेजच्या खड्ड्यात ढिगारा कोसळून दबले गेलेल्या दोन मजुरांना अग्नीशमन दलाच्या जवानांनी तासभराच्या प्रयत्नानंतर वर काढले....

वडनरेरोड येथील हांडोरे मळा भागात ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. महापालिकेतर्फे ड्रेनेज लाईनचे काम सुरु आहे. त्याच्या पंधरा फूट खोल खड्ड्यात हे मजूर अडकले होते.

नाशिकरोड परिसरात जलवाहिनी, ड्रेनेजची कामे गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. या खड्ड्यात पडून तसेच मातीवरुन रात्री-अपरात्री वाहने घसरुन अपघात होत आहेत. महापालिकेने कामे त्वरीत पूर्ण करावीत अशी मागणी होत आहे.

अग्नीशमन अधिकारी अनिल जाधव, फायरमन उमेश गोडसे, शाम काळे, प्रकाश कर्डक, संजय पगारे, बाजीराव कापसे, आर. बी. जाधव, सदाशिव तेजाळे यांनी ही मोहिम राबवली.

नगरसेवक केशव पोरजे यांनी घटनास्थळी धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळवत मदत केली. या भागात ड्रेनज लाईनचे काम सुरु आहे.

त्यासाठी सुमारे तीस फूट लांब व पंधरा फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास त्यात दोन मजूर उतरले होते.

वरचा ढिगारा ढासळून मजूर गाडले गेले. नागरिकांनी तातडीने अग्नीशमन दलाला फोन केला. महापालिका अधिकारी तसेच नगरसेवक केशव पोरजेही दाखल झाले होते. खड्ड्यासाठी जेसीबी तेथे अगोदरपासूनच होता. त्याच्या तसेच टिकाव व फावड्याच्या मदतीने माती बाजूला करुन तासाभरानंतर मजूरांना कर्मचा-यांनी बाहेर काढले. ते जखमी झाले होते.