धो-धो पाऊस, स्मशानभूमीला शेड नाही, पावसातच अंत्यसंस्कार, सुरगाण्यातील भयाण वास्तव

धो-धो पाऊस, स्मशानभूमीला शेड नाही, पावसातच अंत्यसंस्कार, सुरगाण्यातील भयाण वास्तव

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

केळीपाडा (Kelipada) येथे स्मशानभूमीचे शेड नसल्याने चितेवर सागाच्या पानांची पलान शिवून उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. मरणातूनंतरही मृतदेहाला अवहेलना सोसावी लागत असल्याचे भयाण वास्तव सध्या नाशिकच्या जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात केळीपाडा येथे दिसून आले आहे....

सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) वासदा (Wasda) नजीक गुजरात सिमेलगत (Near Gujarat Boundary) असलेले गोदुणे ग्रामपंचायत (Gondune Grampanchayat) मधील केळीपाडा येथे स्मशानभूमी अभावी भर पावसात अंतिम संस्कार करणेसाठी हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत आहेत.

भरपावसात मृतदेहावर अंतिम संस्काराच्या वेळी अवहेलना झाली होती. सोमेश कुवर या युवकाचे अल्पशा आजाराने निधन झाले. सकाळ पासूनच संततधार पावसामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी अद्यापही स्मशानभूमी शेडच नसल्याने अंत्यविधी करायचा कोठे? असा प्रश्न उभा ठाकला होता.

आताच पाऊस थांबेल याची वाट पहाण्यात खुप वेळ गेला. अखेर पावसातच अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या भागात अंतिम संस्कार हे अग्निडाग, मुखाग्नी देऊन केले जातात. धो-धो पावसात मृतात्म्यांस अग्नी देणे शक्य नव्हते. शिवाय लाकडे पण ओली असल्याने अजून पेचप्रसंग निर्माण झाला.

शेवटी चितेवर ताडपत्री व सागाच्या पानांची पलान शिवून धरण्यात आली. पलान म्हणजे सागाची अनेक पसरट पाने काडीने शिवून तयार केलेले पसरट पलान. पुर्वी पावसाळ्यात छत्री नसल्याने पलान शिवून पावसापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर पलान ठेवत असत. तसेच मृतदेहावर अंतिम संस्कार करणे साठी पलान शिवून धरावी लागली. असे करत चितेला अग्नी देण्यात आला.

केळीपाडा येथील स्मशानभूमीत जाण्यासाठी अद्यापही रस्ता नसल्याने विशेषतः पावसाळ्यात खुपच हाल अपेष्टा सहन करावा लागत आहेत. शेतीच्या बांधा वरुन, काटाकुट्यातून प्रेत वाहून घेण्यासाठी रस्ता काढावा लागतो. कित्येकदा संततधार पावसामुळे मृतदेह अर्धेच जळतात.पुन्हा पाऊस उघडल्यावर लाकडे टाकावी लागतात.

मरणानंतरही माणसांच्या हाल अपेष्टांना सामोरे जावे लागते. तालुक्यात आदिवासी अतिदुर्गम भागातील खेडोपाडी अजून ही स्मशानभूमी करीता प्रतिक्षा करावी लागतेय हे न उलगडणारे कोडे आहे. आदिवासी भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र अनेक गावात स्मशानभूमी पर्यंत रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते, तर काही ठिकाणी नदीतून कमरे एवढ्या पाण्यातून मृतदेह वाहून घ्यावे लागतात.

शेड नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात. अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. गोंदुणे ग्रामपंचायतीत अद्याप ही दहा ते बारा गावात अद्याप स्मशानभूमी शेड नाही. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

उर्वरित गावात तात्काळ स्मशानभूमी शेड मंजूर करण्यात यावेत अशी मागणी गणेश वाघ, दिपक मेघा, चिनू धूम, नवसू मेघा, सोनीराम वाडेकर,संजय भोये, कांती धुम,बाबुराव चौधरी, तुळशीराम भोये,जयवंत मेघा,महेश भोये यांनी केली आहे.

गोंदुणे ग्रामपंचायत (Gondune Grampanchayat) मध्ये अजुनही दहा ते बारा गावात स्मशानभूमीत शेड नाहीत.त्यामुळे उघड्यावर अंतिम संस्कार करावे लागतात. त्यामुळे विशेषत पावसाळ्यात आक्समिक निधन झाले तर सरण रचलायला खुप अडचणी निर्माण होतात. शेड नसल्याने आम्हांला उघड्यावर अंत्यविधी उरकण्याचा निर्णय घेतला. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तरी जनसुविधा अथवा ठक्कर बाप्पा योजनेतून स्मशानभूमी शेड उभारून दिल्यास सोयीचे होईल.

मधुकर कुवर -केळीपाडा. मयताचे वडील.

स्मशानभूमी शेड बांधकाम करणेसाठी प्रशासनाकडे नावे पाठवले आहेत.तसेच रोजगार हमी योजनेतून रस्ता मंजूर करण्यात येणार आहे. जागा खाजगी मालकाची असल्याने कागद पत्राची पुर्तता करून काम सुरु करण्यात येईल. स्मशानभूमी शेड उभारून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

जी. आर. देशमुख ग्रामसेवक गोंदुणे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com