
सिन्नर । विलास पाटील Sinnar
प्रशासकीय कारणास्तव नेहमी बदल्या होत असतात. कोरोनाच्या संकटामुळे रखडलेल्या बदल्यांसाठी शासनानेही आदेश केलेले सर्वांनीच पाहिले आहे. त्यामूळे शासकीय विभागांबरोबरच शैक्षणिक संस्थांमध्येही सध्या बदल्यांची लगीनघाई सुरु आहे. मराठा विद्या प्रसारक (Maratha Vidya Prasarak Samaj) शिक्षण संस्थाही त्यात मागे असण्याचे कारण नाही. मात्र, सिन्नर महाविद्यालयातील साडे चार महिन्यांपूर्वी कोरोनाने मृत झालेल्या एका प्राध्यापकाची ओझर येथील महाविद्यालयात बदली केल्याचा आदेश आल्याने ही बदली चर्चेचा विषय ठरली आहे....
सिन्नर महाविद्यालयात कनिष्ठ व वरिष्ठ (Junior and Senior College Sinnar) मिळून 150 वर प्राध्यापक, सेवक वृंद कार्यरत आहे. गेल्या दीड वर्षांपासून महाविद्यालयातील शैक्षणिक कामकाज बंदच आहे. विद्यार्थी येत नसल्याने वर्ग भरण्याचा विषयच नाही.
काही वर्ग ऑनलाईन सुरूही असतील. मात्र, प्राध्यापकांसह शिक्षकेतर सेवकांना दररोज महाविद्यालयात यावेच लागते. कोरोनाच्या काळात काही महाविद्यालयांना शासकीय अनुदान आले असेल किंवा काहींना मान्यता आली असेल.
त्यामुळे प्रशासनिक कारणासाठी काही प्राध्यापकांसह सेवकांच्या बदल्या करण्याचा निर्णय संस्थेने घेतला असावा. गुरुवारी (दि.26) महाविद्यालयातील 15 प्राध्यापक, शिक्षकेतर सेवकांच्या बदल्या झाल्याचा आदेश संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयातून महाविद्यालयाला प्राप्त झाला. स्थिर वेतनावर काम करणार्या दोन-तीन प्राध्यापकांना पूर्ण वेतन मिळण्याच्या जागेवर बदली मिळाल्याने त्यांना हायसे वाटणे स्वाभाविक आहे.
दोघा-तिघांना सिन्नरला येऊन-जाऊन करणे अडचणीचे ठरत होते. त्यांना त्यांच्या सोईच्या शहरांमध्ये बदली मिळाल्याने त्यांना आनंद होणेही समजू शकते. मात्र, काही महिन्यांपूर्वीच कोवीड-19 ने मृत्यू झालेल्या आपल्या सहकार्याची ओझरच्या महाविद्यालयात बदली करण्यात आली असल्याचा आदेश वाचल्यानंतर अनेकांच्या भुवया ताणल्या गेल्या.
अशा निर्णयाची चर्चा तर होणारच. अपेक्षेप्रमाणे या आदेशाचीही चर्चा जिल्हाभर झाली. संस्थेच्या पदाधिकार्यांच्या पुढे-पुढे करणार्यांना मलईदार पदावर नियुक्ती देण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. अशा पदावरील अधिकार्यांच्या विश्वासावरच संस्थांचा कारभार चालत असतो. पदाधिकारी अशा अधिकार्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि त्यातून कसे गोत्यात येऊ शकतात हे या घटनेने दाखवून दिले आहे.
संस्थेच्याच एका शिक्षणाधिकार्यांनी संस्थांतर्गत बदलीचे प्रस्ताव तयार करून संस्थेच्या सरचिटणीस यांच्या समोर ठेवल्या आणि सरचिटणीस यांनी ही कुठली खातरजमा न करता डोळे झाकून केलेल्या सहीमुळे सर्वांचेच हसे झाल्याची चर्चा होत आहे. पदाधिकारी आपल्याच मर्जीने नेमलेल्या अधिकार्यांवर कुठपर्यंत विश्वास ठेवतात हेही या घटनेने अधोरेखित केले असून ही बाब संस्थेच्या हिताची नसल्याची चर्चा या निमित्ताने होते आहे.
मयत प्राध्यापकाच्या बदलीची चर्चा संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर तातडीने संबंधित आदेश मध्यवर्ती कार्यालयात परत मागविण्यात आल्याचे समजते. या बदलीचा निर्णय रद्द करण्यात आल्याची चर्चा असली तरी या बदलीच्या आदेशावर सरचिटणीसाची फसवून(?) सही घेणार्या शिक्षणाधिकार्यावर कुठली कारवाई झाली हे मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे.संस्थेनेच नेमलेले शिक्षणाधिकारी विश्वासाच्या नावाखाली काय-काय करतात याबाबतच्या खमंग चर्चांनाही या निमित्ताने ऊत आला आहे.
करोनाने निधन : सिन्नर महाविद्यालयातील इतिहासाचे शिक्षक भागवत मालू कापडणे यांचे एप्रिल 2020 मध्ये कोरोनाने नाशिक येथे निधन झाले असून ते गेल्या चार साडेचार वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत होते. ते नाशिक येथूनच महाविद्यालयात ये-जा करायचे आणि नाशिक येथे कोरोनावर उपचार घेत असतानाच त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडून महाविद्यालयात व महाविद्यालयाने संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात याबाबत माहिती दिली नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल.