रुग्णांची लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा; ...अन्यथा शिवसेनास्टाईल आंदोलन...
शिवसेना

रुग्णांची लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा; ...अन्यथा शिवसेनास्टाईल आंदोलन...

नाशिक | प्रतिनिधी

महापालिकेने लेखापरिक्षकांची नेमणूक करून देखील काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट सुरूच असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने अशा रुग्णालयांविरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. रुग्णांची लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी प्रशासनाला दिला आहे....

करोनाचा प्रार्दुभाव झाल्यानंतर शहरात अनेक रुग्णांलयांना करोनाबाधितांवर उपचारासाठी परवानगी देण्यात आली. पहिल्या लाटेत खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून अवाजवी बिलांची आकारणी सुरू केल्यानंतर शिवसेनेने त्याविरोधात आवाज उठविला. मनपा प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागली.

खासगी रुग्णालयांमधील अवाजवी बिलांवर अंकूश ठेवण्यासाठी प्रशासनाने सर्व खासगी रुग्णालयांमध्ये बिले तपासणीसाठी लेखापरिक्षकांची नेमणूक केली. त्यामुळे रुग्णांच्या आर्थिक लूटीला बहुतांश आळा बसला. मात्र दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत.

खासगी रुग्णालयांमध्ये नियुक्त केलेले लेखापरिक्षक रुग्णांची लूट रोखण्यात कमी पडत आहेत. बिलांची तपासणी पूर्ण क्षमतेने होताना दिसत नाही. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरत आंदोलन करीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लेखापरिक्षकांमार्फत खासगी रुग्णालयांती बिलांची काटेकोर तपासणी करावी. रुग्णांची आर्थिक पिळवणूक रोखावी. अन्यथा शिवसेनेला आक्रमक पावित्रा घ्यावा लागेल, असा अल्टीमेटम विरोधी पक्षनेते बोरस्ते व गटनेते शिंदे यांनी आयुक्तांना सादर केलेल्या पत्राद्वारे दिला आहे.

नाशिक मधील खासगी रुग्णालयांच्या मनमानीविरोधात शिवसेनेने आवाज उठविल्यानंतर महापालिकेने सर्व खासगी रुग्णालयांमध्ये लेखापरिक्षकांची नेमणूक केली. आता मात्र पुन्हा एकदा खासगी रुग्णालयांविरोधात तक्रारी येत आहेत. रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई न केल्यास शिवसेनेला आक्रमक व्हावे लागेल.

अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, मनपा

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com