अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना निवासी शाळा प्रवेश सुरू

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना निवासी शाळा प्रवेश सुरू

नाशिक l प्रतिनिधी

नाशिकआदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक प्रकल्प क्षेत्रातील पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक,दिंडोरी, येवला, निफाड, सिन्नर व इगतपुरी या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ साठी इयत्ता पहिली इंग्रजी माध्यामाच्या निवासी शाळेत प्रवेश प्रक्रीया सुरू झाली करण्यात आल्या आहेत...

प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प वर्षा मीना यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.शाळा प्रवेशासाठी विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा.

पालकांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असावे. विद्यार्थी दारिद्रयरेषेखालील असल्यास त्याबाबतचा व यादी अनुक्रमांक व दाखल्याची सत्यप्रत अर्जास जोडावी. विद्यार्थ्यांच्या पालकाची उत्पन्न मर्यादा रूपये एक लाख इतकी असावी.

पालक शासकीय किंवा निमशासकीय नोकरदार नसावेत. इयत्ता १ लीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय ३० सप्टेबर २०२१ रोजी ६ वर्षे पूर्ण असावे. अर्जासोबत विद्यार्थ्याचे २ फोटो, आधारकार्ड व वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

१ मार्च २०२१ पासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक,आदिवासी विकास भवन, नाशिक येथे पाल्याचा जन्म दाखला व पालकांचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र प्रवेश सादर केल्यानंतर प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत.

सदर अर्ज परिपूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह १९ मार्च २०२१ पर्यंत प्रकल्प कार्यालयात सादर करावयाचे आहेत. पात्र विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी पेठ, इगतपुरी, सिन्नर व नाशिक तालुक्यासाठी १९ मार्च २०२१ रोजी तर त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, येवला व निफाड तालुक्यांसाठी २० मार्च २०२१ रोजी एकलव्य स्कूल पेठ रोड येथे सकाळी १० वाजता होणार आहे.

मंजूर लक्षांकापैकी जास्त प्रमाणात अर्ज उपलब्ध झाल्यास लकी ड्रॉ पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.आदिवासी पालक व विद्यार्थी यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com