लाचखोर 'पीएसआय'सह एजंटला तीन दिवसांची पोलीस कोठडी

लाचखोर 'पीएसआय'सह एजंटला तीन दिवसांची पोलीस कोठडी
crime news

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सट्टा सुरळीत सुरु करण्यासाठी नाशिक ग्रामीणच्या पोलीस उपनिरीक्षकास तीन लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आल्याची घटना काल (दि ३०) घडली होती. दरम्यान, आज या पोलीस उपनिरीक्षकास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे...

अधिक माहिती अशी की, ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महेश वामनराव शिंदे याने त्याच्या एका साथीदार संजय आझाद खराडे याच्या माध्यमातून आयपीएलच्या सट्टयाप्रकरणी (IPL Betting) कारवाई न करणे आणि सट्टा सुरळीत सुरु ठेवणे यासाठी गेल्या आठवड्यात शनिवारी (दि २५) रोजी चार लाखांची लाच मागितली होती.

यानंतर तडजोडीअंती काल (दि ३०) रोजी तीन लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडकले होते. आज पीएसआय शिंदेसह, खराडे यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, लाचखोर उपनिरीक्षक शिंदे याची पोलीस दलातील कारकीर्द देखील वादग्रस्तच असल्याचे समोर आले आहे. शहरातील सातपूर परिसरातील एक खूनाच्या गुन्ह्यात संशयितांना मदत केल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबत त्याचे पोलीस दलातून काही काळ निलंबनदेखील झाले होते. पुन्हा रुजू झाल्यावर शिंदेच्या रूपाने ग्रामीण पोलीस दलातील मोठा मासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने जैसे करणी वैसी भरणी अशा चर्चांना उधान आले आहे. शहर पोलीस दलातून ग्रामीण भागात बदली झाली तरी शहर हद्दीतील अवैध धंद्यांवर तो नजर ठेवून होता असे पोलीस दलाच्या सूत्रांकडून कळते.

Related Stories

No stories found.