यशवंतराव मोहितेंचे कर्तृत्व आणि महाराष्ट्र!

यशवंतराव मोहितेंचे कर्तृत्व आणि महाराष्ट्र!

पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आठवणींना उजाळा

जानोरी | वार्ताहर

विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदासाठी अर्थात मुख्यमंत्रिपदासाठी झालेल्या मतदानात वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) विजयी होऊन यशवंतराव मोहिते (Yashwantrao Mohit Bhau) (भाऊ) पराभूत झाले. परंतु त्यांच्यासारखा माणूस आपल्या मंत्रिमंडळात हवा, या विचारांतून वसंतदादा कटुता न ठेवता मोठ्या मनानं मोहिते यांच्या घरी गेले आणि त्यांना मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून सामील होण्याची विनंती केली व त्यांनी ती मान्य केली....

दिवंगत मोहिते यांचे कर्तृत्व (व दादांचे मोठे मन) या घटनेतून सिद्ध झालं. पुढे मंत्रिपदाच्या काळात दिवंगत भाऊंनी अनेक दूरगामी निर्णय घेऊन आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. राजकारणात आज लोप पावलेली निरलसता, व्यक्तिगत सौहार्द आणि वैशिष्ट्यं त्या काळातील राज्यकर्ते कसे जपत होते याचे हे उदाहरण! श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रसंगाचे वर्णन केले. निमित्त होते कै. यशवंतराव मोहिते यांचा बारावा स्मृतिदिन...

सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आयोजित बाराव्या 'सह्याद्री संवाद' उपक्रमांतर्गत 'साठोत्तरी महाराष्ट्र आणि यशवंतराव मोहिते' या व्याख्यानात चव्हाण यांनी रविवारी (ता.22) दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला.

सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे यावेळी उपस्थित होते. 1952 साली ज्या कराड दक्षिण मतदारसंघातून कै. मोहिते यांची विधिमंडळातील कारकीर्द सुरू झाली व पुढे अनेक वर्षे त्यांनी प्रतिनिधित्व केले त्याच मतदारसंघाचे पृथ्वीराज चव्हाण आता आमदार आहेत.

हे औचित्यही या व्याख्यानाला होते. चव्हाणयांनी दिवंगत यशवंतराव मोहिते, यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे तुळशीदास जाधव, केशवराव पवार, बाळासाहेब देसाई, आनंदराव चव्हाण, यांच्या कै. भाऊंच्या संदर्भातील अनेक आठवणी नमूद केल्या. कै. भाऊंच्या वाटचालीतील अनेक घटनांचे दाखले श्री. चव्हाण यांनी दिले. या ऑनलाइन व्याख्यानाला संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ''दिवंगत यशवंतराव मोहिते (भाऊ) हे शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य होते. याच पक्षातर्फे ते 1952 साली प्रथम विधिमंडळात गेले. पुढे कै. यशवंतराव चव्हाण यांच्या आवाहानाला प्रतिसाद देत ते काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात आले. कै. चव्हाणसाहेबांनी भाऊंना जवळ केले तसेच बेरजेचे राजकारण कै. वसंतदादांनी केले. कै. मोहिते यांनी कुठलाही पूर्वग्रह आणि राजकारण डोक्यात न ठेवता अर्थ, सहकार, परिवहन आणि गृहनिर्माण खात्याचे मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या हिताचे दूरगामी निर्णय घेतले.

सत्तेच्या राजकारणात असूनही त्यांनी आपला मूळ डावा व शेतकरी-कामगार हिताचा विचार सोडला नाही. पश्चिम महाराष्ट्रातले असूनही ऊस उत्पादकांइतकेच त्यांनी कोरडवाहू कापसालाही महत्त्व दिले. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशचे पीक असलेल्या कापसासाठी त्यांनी कापूस एकाधिकार खरेदी योजना आखली व अंमलात आणली. अर्थमंत्री असताना राज्याच्या प्रत्येक भागाचा अभ्यास करुन सर्वांना न्याय देण्यासाठी ते स्वतः अर्थसंकल्प तयार करीत असत. गृहनिर्माणमंत्री असताना मंडळाची स्थापना, राज्य परिवहन मंडळाची स्थापना असे अऩेक निर्णय त्यांच्यामुळे झाले.''

कोयना धरण आणि भाऊ

मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते. सातारा जिल्ह्यातील कोयना धरण आणि गुजरातमध्ये तापीवरील कुकाई धरण निर्मितीचा प्रस्ताव सराकरपुढे होता. मोरारजीभाई गुजरातचे असल्याने गुजरातचे धऱण आधी होईल, हे निश्चित होते. मात्र आमदार म्हणून कै. भाऊंनी खासगी विधेयक मांडले व 3 जुलै 1952 रोजी त्यावर भाषण केले. सातारा जिल्ह्यासाठी, महाराष्ट्राच्या वीजनिर्मितीसाठी आणि अनेक जिल्ह्यांच्या कृषी विकासासाठी कोयना धरण कसे महत्वाचे आहे यावर त्यांनी अत्यंत आक्रमक तेवढेच अभ्यासपूर्ण भाषण केले. या भाषणाने ऐतिहासिक काम केले. महाराष्ट्राची वरदायिनी म्हटले जाते असे कोयना धरण अस्तित्वात आले, हा प्रसंग श्री. चव्हाण यांनी सांगितला.

''कै. भाऊ विचारवंत होते. त्यांचा व्यासंग, वाचन, वक्तृत्व आणि त्यांनी केलेले लिखाण अभ्यासले तर त्याचा प्रत्यय येतो. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र 1960 अस्तित्वात आला. पण 1953 साली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचे विधेयक कै. मोहिते यांनी सर्वप्रथम मांडले व त्यावर ऐतिहासिक भाषण केले. महाराष्ट्राची राजधानी मुंबईच असावी, हा आग्रह त्यांनी केला होता. काँग्रेसमध्ये असूनही कै. भाऊसाहेब हिरे यांनीे शेकाप आमदार असलेल्या भाऊंच्या भाषणाला पाठिंबा दिला. कै. भाऊंची विधिमंडळातील भाषणे अभ्यासली तर त्यांची तळागाळातील जनतेबद्दलची बांधिलकी त्यांच्यातील विचारवंत आपल्याला ठायीठायी जाणवतो. ही भाषणं आणि त्याला मंत्री म्हणून पूरक कृती आजच्या पिढीला दिशादर्शक ठरतील'', असा विश्वास श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र हे राज्यातील आघाडीचे राज्य म्हणून ओळखले जाते. राज्याच्या उभारणीत कै. यशवंतराव मोहिते तसेच अनेक राज्यकर्त्यांनी अत्यंत निष्ठेने आणि तळमळीने काम केले. राज्याच्या साठ वर्षांच्या वाटचालीत जे विकासाचे टप्पे आहेत त्यात आर्थिक, सामाजिक, सहकाराच्या विकासात कै. भाऊंचे योगदान मोलाचे आहे. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी आपले समाजवादी विचार त्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी वापरले. ग्रामीण आणि शेतकऱ्यांचा विकास हे सह्याद्री फार्म्सचे मुख्य उद्दिष्ट आहे. या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्राच्या कर्तृत्ववान व्यक्तींचे स्मरण करणे व त्यांच्या कामातून ऊर्जा मिळवणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. नव्या पिढीला याची माहिती व्हावी यासाठी या उद्देशातून व्याख्यानाचा विषय निवडण्यात आला.

विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्म्स

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com