जिल्हा रूग्णालयास २५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व ५ ‘बीआयपीएपी’ यंत्र

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचा पुढाकार
जिल्हा रूग्णालयास २५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व ५ ‘बीआयपीएपी’ यंत्र

नाशिक | प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि वैद्यकीय व्यवस्थेचा विस्तार करण्यासाठी योगदान दिलेल्या पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड रिस्पॉन्स (पीपीसीआर) या स्वयंसेवी समूहाने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, या समुहाच्या वतीने नाशिक जिल्हा सामान्य रूग्णालयास २५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व पाच ‘बीआयपीएपी’ यंत्र देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली...

पीपीसीआर हा मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर ( एमसीसीआयए ) प्रणित स्वयंसेवी समूह आहे. या समूहात उद्योग, वैद्यकीय, संशोधन अशा विविध क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश आहे.

या समूहाने गेल्या वर्षभरात पुणे , पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात वैद्यकीय व्यवस्था विस्तारण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले आहे.

तसेच सध्याचा प्राणवायूचा तुटवडा दूर करण्यासाठी या समूहाने सिंगापूरहून कृत्रिम श्वसन यंत्रणा , ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आयात केले आहेत. पुणे जिल्ह्यात वैद्यकीय उपकरणे देतानाच राज्यातील अन्य आठ जिल्ह्यांनाही आवश्यकतेनुसार मदत केरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबने म्हणाले, की करोनाचा फटका बसलेल्या अहमदनगर , नागपूर, ठाणे, चंद्रपूर, भंडारा, लातूर, पालघर आणि नाशिक या आठ जिल्ह्यांतील वैद्यकीय व्यवस्थेसाठी मदत म्हणून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व बीआयपीएपी यंत्र देण्यात येत आहेत.

त्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. त्याशिवाय या जिल्ह्यांतील नागरिकांनी मिळून पीपीसीआरच्या माध्यमातून निधी संकलन सुरू केले आहे. या संकलित होणाऱ्या निधीतून ही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अन्य जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसह नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देत असल्याचे आपल्या या संदर्भात जिल्हा प्रशासनास लिहिलेल्या पत्रात नमूद पत्रात केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com