खुशखबर! नाशिक महापालिकेत होणार 'मोठी' भरती

खुशखबर! नाशिक महापालिकेत होणार 'मोठी' भरती
नाशिक मनपा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शासनाकडे 2017 साली आकृतीबंध पाठविण्यात आला असला तरी भरतीला मान्यता मिळालेली नाही. यामुळे नाशिक महापलिका कंत्राटीवर किती दिवस चालवायची, याचा विचार प्रशासनाने करावा, असे सांगत महापौर सतीश कुलकर्णी यांनी नियमानुसार मनपात मानधनावर त्वरीत भरती करावी, असे आदेश दिले. सुमारे 6 तास नोकरभरतीसाठी आयोजित विशेष महसभा सुरू होती....

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंगेस, शिवसेना यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भरतीसाठी महासभा घेण्याबाबत शंका उपस्थित करुन विरोध केला.

चतुर्थश्रेणी वर्गातील व्हाल्वमन, बिगारी, फायरमन, वाहनचालक, सफाई कामगार, कनिष्ठ लिपीक, उद्यान निरिक्षक, माळी, उद्यान बिगारी, इंजिनिअर्स आदी पदावर माधनावर भरती व्हावी, यासाठी आज महापौर सतिश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भाजपने मानधनावर भरती करण्याची भूमिका घेतली असून, यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. १७) विशेष महासभा बोलविण्यात आली होती. महापालिकेतील 'क' व 'ड' संवर्गातील रिक्त पदे मानधनावर भरती केली जाणार असून सातशे सफाई कर्मचाऱ्यांची देखील मानधनावर नियुक्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

महापालिकेतील रिक्त पदे सरळसेवेने भरती करण्यास वाढत्या आस्थापना खर्चाची अडचण असल्याने फिक्स पे तत्वावर भरती करण्याचा प्रयत्न यापूर्वी करण्यात आला होता, मात्र तो यशस्वी झाला नाही. सत्तेच्या अखेरच्या टप्प्यात महापालिकेत मानधन भरतीच्या रुपाने हा मुद्दा मार्गी लावण्याचे भाजपचे प्रयत्न आज दिसून आले.

स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या पत्रावर समिती सदस्य मुकेश शहाणे, रत्नमाला राणे, प्रतिभा पवार व माधुरी बोलकर यांनी मानधन भरतीसाठी विशेष महासभेची मागणी केली होती. त्यानुसार महापौर कुलकर्णी यांनी महापालिकेतील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजात आलेली शिथिलता दूर करण्यासाठी मानधन भरतीच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी विशेष महासभा बोलविली होती.

महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर विविध संवर्गातील एकूण ७०९० पदे मंजूर असून त्यापैकी सुमारे २६३१ पदे अधिकारी, कर्मचाऱ्यांची दरमहा होणारी सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त झाली आहेत. महापालिकेत गेल्या २४ वर्षांपासून नोकरभरती होवू शकलेली नाही. आता जर ही २६३१ रिक्त पदे मानधनावर भरती करायचे ठरले तर त्यामध्ये अनेक अडचणी आहेत.

सध्या पदोन्नतीची प्रक्रिया पार पडल्यामुळे अनेक पदे रिक्त झाली आहेत. नियमानुसार या पदावर कनिष्ठ दर्जाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बढती देणे अपेक्षित आहे. त्यानंतर जी पदे शिल्लक राहतील त्या ठिकाणी मानधनावर भरती करावी लागते.

चतुर्थश्रेणी वर्गातील व्हाल्वमन, बिगारी, फायरमन, वाहनचालक, सफाई कामगार, कनिष्ठ लिपीक, उद्यान निरिक्षक, माळी, उद्यान बिगारी, इंजिनिअर्स आदी पदावर माधनावर भरती केली जाणार आहेत.

महासभेच्या सुरुवातीला महापौरांनी महापालिकेच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांकडून सध्या आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सेवकांची संख्या व रिक्त पदांची माहिती घेतली.

यामध्ये पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घरपट्टी, पाणीपट्टी, बांधकाम विभाग, फायर अग्निशामक दल,प्रशासन विभाग, शिक्षण विभाग आदींची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. यानंतर चर्चा सुरू करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाचे माजी गटनेते जगदीश पाटील यांनी महापालिकेच्या सेवक, अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी मनुष्यबळाची गरज असल्याचे सांगितले. नागरिकांना महापालिकेकडून खूप अपेक्षा असतात, मात्र आकृतिबंध मंजूर होत नसल्यामुळे महापालिकेला देखील अडचणी येत आहेत.

सध्या देवाच्या भरोश्यावर मनपा चालले आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून मानधनावर भरती करण्याची मागणी करीत या प्रस्तावाला समर्थन दिले. नाशिक शहर झपाट्याने वाढ होत आहे, तर नवीन वस्ती 5- 5 वर्षे घरपट्टी, पाणीपट्टीचे बिल मिळत नसल्यामुळे त्यांना ते भरता येत नाही. यामुळे महापालिकेचे एक प्रकारे नुकसान होत आहे. व पैसा देखील मिळत नाही. महापालिकेला मनुष्यबळ मिळाले तर सर्व काम सुटसुटीत होईल व महापालिकेच्या उत्पन्नात देखील भर पडेल असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप करीत निवडणुकीच्या तोंडावर भरती साठी विशेष महासभा बोलावणे याचा काय उद्देश आहे, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मागील काही काळापासून आयटी पार्कसाठी जागा आदी आश्वासनही देण्यात येत आहे, मात्र निवडणुकीसाठी फक्त काही महिने शिल्लक राहिले आहे, हे सर्व कामे होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत बेरोजगारांच्या भावनांची खेळ करू नका असा सल्ला दिला. तसेच पॉलिसी निर्णय घ्यावे, भरती प्रक्रियेच्या निर्णय आचारसंहितेत अडकणार नाही ना याबाबत दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.

भारतीय जनता पक्षाचे मुकेश शहाणे यांनी अनेक विभागात माणूस नाही एका व्यक्तीकडे चार व्यक्तींचे कामे आहेत. ठेकेदाराला मोठे करून काय उपयोग होणार. त्यापेक्षा स्थानिक भूमिपुत्रांना मानधनावर सामावून घ्यावे, अशी मागणी केली. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या प्रस्तावना असून संपूर्ण सभागृहाने याला समर्थन द्यावे, अशी मागणी त्यांनी करीत नोकर भरतीचे समर्थन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार यांनी या प्रस्तावाला विरोध केला. निवडणुकीच्या तोंडावर प्रस्ताव सादर केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत प्रभागातील अगदी निवडक लोकांना मानधनावर नोकरीला आम्ही लावले तर बाकीचे मोठा वर्ग नाराज होईल व त्याचा फटका निवडणूकीत बसेल असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी प्रस्तावाबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचे सांगितले. तसेच महापालिकेतील मनुष्यबळ कमी आहे ते भरण्याचे समर्थांनी त्यांनी केले, मात्र नियमानुसार व व्हावे अशी मागणी केली.

शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी मानधन भरतीसाठी 53 ऑब्लिक 3 कायद्यानुसार महापालिका आयुक्तांना अधिकार आहे, वर्ग 3 व 4 साठी भरती सहा महिने भरती करण्यात येते, मात्र प्रस्तावात 11 महिन्यांचे उल्लेख करण्यात आल्यामुळे त्याकडे लक्ष वेधले.

दरम्यान 2019-20 साली महापालिकेचा आस्थापना खर्च 29. 83 टक्के होता, त्यावेळेस भरतीप्रक्रिया का करण्यात आले नाही, सध्या 38 टक्के पर्यंत खर्च आहे. तरीही भरती प्रक्रियेसाठी विशेष महासभा बोलावण्यात आल्या बद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत महापालिका आयुक्तांनी स्पष्ट खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली.

यावर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी हा प्रस्ताव प्रशासनाचा नाही, म्हणून पूर्व अभ्यास झालेला नाह, तरी सभेचा निर्णय काय होतो, याच्यानंतर प्रशासन याबाबत अभ्यास करेल. नियमाने भरती व्हावी, असा हेतू आहे. महासभेच्या निर्णयानंतर आम्ही आमची भूमिका सांगू शकतो, असे आयुक्तांनी सांगितले.

आयुक्तांची बहुतेक हां!

महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव यांनी 1998 पासून महापालिकेत भरती प्रक्रिया झाली नसल्याचे सांगितले. मात्र आता ही प्रक्रिया सुरू झाली असून महापौरांनी पुढाकार घेऊन विशेष महासभा आयोजित केली. त्यात महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची बॉडी लॅंग्वेज पॉझिटिव्ह दिसत असल्यामुळे भरती होणार असे वाटते, असे सांगितले तसेच तातडीने मानधनावर भरती करावी अशी मागणी केली.

Related Stories

No stories found.