आर्मी अधिकाऱ्याच्या नावे दिली ऑर्डर; हॉटेल चालकास गंडवले

आर्मी अधिकाऱ्याच्या नावे दिली ऑर्डर; हॉटेल चालकास गंडवले

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

पाच दिवसांची जेवणाची ऑर्डर देतो असे म्हणत हॉटेल मालकाला ऑनलाइनवरून 35 हजार रुपयांना गंडवल्याची घटना सात-आठ दिवसांपूर्वी तालुक्यातील पांढुर्ली (Pandhurli) येथे घडली. विंचूर दळवी (Vinchur Dalavi) येथील गोविंद दळवी यांचे पांढुर्ली येथे हॉटेल राज दरबार नावाचे हॉटेल असून 18 ऑगस्ट रोजी दुपारी त्यांना मोबाईलवर एकाचा फोन आला...

आपण आर्मीमध्ये कॅप्टन असून मुसळगावमध्ये आर्मीचा कॅम्प चालू आहे. तेथे जेवण पाहिजे असे म्हणत या तोतया कॅप्टनने 10 काजू कर्‍ही, 10 पनीर बटर मसाला, 30 रोट्या व दहा राईस तयार करून ठेवा. रात्री दहा वाजता आमचा बंदा येईल आणि तुम्हाला तुमचे बिल देऊन जेवण घेऊन जाईल असे त्यांने सांगितले. त्याप्रमाणे रात्री दळवी यांनी ऑर्डरप्रमाणे भाज्या, रोटी तयार करून ठेवली.

रात्री दहा वाजता पुन्हा त्या तोतया अधिकार्‍याचा फोन आला. त्याने ऑर्डरची चौकशी केली आणि पेमेंट ऑनलाइन पाठवले तर चालेल का असे म्हणत तुम्ही कशावर व्यवहार करतात. फोन पे वर की अन्य असं म्हणत तोतया कॅप्टनने त्याचे बँकेचे एटीएम कार्ड व्हाट्सअप वर पाठवले आणि दळवी यांनाही त्यांचे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम कार्ड व्हाट्सअप वर पाठवायला सांगितले.

आर्मीचा माणूस कशाला फसवणूक करील अशी दळवी यांची गाढ श्रद्धा. यापूर्वी दोन-तीन वेळा आर्मीचे अधिकारी त्यांच्या हॉटेलात जेवून गेलेले असल्याने अनुज नाव सांगणार्‍या तोतया अधिकार्‍यावर दळवी यांनी विश्वास ठेवला. एटीएम कार्डवरील नंबर वाचता येत नाही असं म्हणत दळवी यांच्याकडून कार्ड नंबर त्याने वाचून घेतला आणि त्याच वेळी 4 आकडी ओटीपी नंबरही तीन-चार वेळा सांगायला भाग पाडत दळवी यांना बोलण्यात गुंतवुन ठेवले.

तेवढ्या दरम्यान दळवी यांच्या खात्यावरून 35640 रुपये तोतया अधिकार्‍याने आपल्या खात्याकडे वळवून घेतले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दळवी यांनी या अधिकार्‍याच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बंद येत होता. तर त्याने दिलेली ऑर्डर घेण्यासाठी कोणीही आर्मीचा अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे दुसर्‍या दिवशी जिल्हा पोलिसांच्या सायबर ब्रांचमध्ये जाऊन दळवी यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याशिवाय ऑनलाइन तक्रारही दाखल केली असून पोलिसांकडून संबंधितांचा शोध घेण्यात येत आहे.

मधाळ हिंदी भाषेच्या आहारी जात दळवी यांचे मोबाईलवर संभाषण सुरू असतानाच दैनिक बचत पावती घेण्यासाठी गावातीलच एक तरुण नेहमीप्रमाणे हॉटेलवर आला. दळवी यांनीही फोन सुरू असतानाच आपल्याला ऑनलाईन ऑर्डर आल्याचे त्याला सांगितले. या तरुणाला संशय आल्याने त्याने दळवी यांचे संभाषण थांबवत मोबाईल हातात घेतला असता चार वेळा व्यवहार करीत तोतयाने दळवी यांच्या खात्यावरून पस्तीस हजार सहाशे चाळीस रुपये काढून घेतल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले व खात्यावर शिल्लक असलेले पंचवीस तीस हजार रुपये तातडीने दुसर्‍या बँक खात्यावर वर्ग करण्यास त्यांना भाग पाडले. हा पावतीवाला आला म्हणून दळवी यांचे पंचवीस-तीस हजार रुपये वाचले अन्यथा फसवणुकीचा आकडा दुप्पट होऊ शकला असता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com