खुशखबर! सोमवारपासून 'इतक्या' शाळा होणार सुरु; निर्बंधाबाबत झाला असा निर्णय

खुशखबर! सोमवारपासून 'इतक्या' शाळा होणार सुरु; निर्बंधाबाबत झाला असा निर्णय

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यातील ३३५ शाळा येत्या सोमवारपासून (दि १९) पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करोना आढावा बैठकीत बोलत होते....

ज्या गावात गेल्या महिनाभरात एकही करोनाचा रुग्ण सापडला नाही अशा गावातील या शाळा येत्या सोमवारपासून सुरु केल्या जाणार आहेत. याबाबतच्या सूचना संबंधित विभागाला करण्यात आल्या असून संपूर्ण नियमांचे पालन शालेय स्तरावर झाले पाहिजे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील एकूण ४२ हजार पालकांनी शाळा पूर्ववत सुरु करण्यासाठी आणि पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी परवानगी म्हणजेच संमतीपत्र भरून दिले आहे. त्यामुळे शाळांची घंटा १६ ते १८ महिन्यांच्या नंतर वाजणार असल्याचे भुजबळ म्हणाले.

तसेच दुपारी चार वाजेनंतरच्या निर्बंधांमध्ये शिथिलता मिळावी यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातून मागणी होत होती. यावर आज त्यांनी कुठल्याही प्रकारचे निर्बंध शिथिल केले जाणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले असून निर्बंध अधिक कडक करण्यात आले पाहिजेत असेही सांगितले आहे.

त्यामुळे दुपारी चारनंतर कुठल्याही प्रकारची सवलत नाशिककरांना आजच्या बैठकीत देण्यात आलेली नाही. सध्या राजकीय दौरे वाढले आहेत. यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांवर निर्बंध आणण्याचेही मत यावेळी भुजबळ यांनी मांडले.

सोमवारपासून सुरु होणाऱ्या शाळा या ८ वी इयत्ता ते १२ वी इयत्तेपर्यंत असतील. तसेच दुपारी चार वाजेच्या आत विद्यार्थ्यांना सोडणे अनिवार्य करण्यात आल्याचेही भुजबळ यांनी याप्रसंगी सांगितले.

शहरातील शाळांबाबत शक्यता कमीच

नाशिक महानगर परीसरात अजूनही करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे येथील शाळा सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप होणे बाकी आहे. सोमवारपासून नाशिक शहरातील किती शाळा सुरु होणार याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.

निर्बंध अधिक कडक होणार

शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी केली जाणार आहे. राजकीय, सामाजिक, शासकीय किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. मोर्चे, आंदोलने व निदर्शने याला परवानगी नसेल. तसेच दुकानांची वेळ ही दुपारी ४ वाजेपर्यंतच असेल. विकेंड लॉकडाऊन कायम असेल. पर्यटनस्थळी जमाव बंदी, संचारबंदी अंतर्गत कारवाई होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com