यंदा बी.डी. भालेकर मैदानावर बसणार 'एकच  गणपती'
नाशिक

यंदा बी.डी. भालेकर मैदानावर बसणार 'एकच गणपती'

अनेक वर्षांची परंपरा खंडित; गणेश भक्तांचा हिरमोड

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या बी. डी. भालेकर मैदानावर यंदाच्या वर्षी सर्व मंडळमिळून कुठल्याही स्वरूपाचा देखावा, विद्युत रोषणाई, साऊंडचा गाजावाजा न करता अत्यंत साध्या स्वरूपात एकच गणपती एकाच बॅनर खाली बसविण्याचा निर्णय झाल्याची माहिती मंडळाचे पदाधिकारी गणेश बर्वे व पदमाकर गावंडे यांनी दिली.

त्यामुळे गेल्या अनेक वर्षाची परंपरा खंडीत होऊन गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. जगभरात करोनाने घातलेले थैमान तसेच नाशिक शहरात वाढत असलेली करोनाची परिस्थिती बघता बी डी भालेकर मैदानावरील गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरी करण्याचे निश्चित करण्यात आले.

दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता करोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पोलिस प्रशासन व महामंडळाच्या मीटिंगमध्ये जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते महामंडळाचे कार्याध्यक्ष शंकरराव बर्वे यांनी सर्व मैदान मिळून एकच गणपती बसवू अशी ग्वाही दिली होती.

दरम्यान, बर्वे यांच्या निधनामुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आज जाहीर करण्यात आले. गणेशोत्सव साध्या पद्धतीने करणार असलो तरी या दरम्यान रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, करोना टेस्ट, सर्वरोग निदान शिबीर, गरजूंना अन्नधान्य वाटप, मास्क वाटप, औषधे वाटप, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप इत्यादी सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

करोना जनजागृती करून आज पर्यन्त मंडळाणी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती व्हिडीओ रेकॉर्डिंग करून फेसबूक, व्हाटसअप, यूट्यूब मार्फत नगरिकांपर्यंत पोहचविणार आहेत.

दरम्यान, या निर्णयाचे सर्व स्थरतून स्वागत होत असून हा नाशिक पॅटर्न संपूर्ण राज्यभर राबवावा असे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी राजे छत्रपतीचे सचिन रत्ने, महिंद्रा सोनाचे राजेंद्र खैरणार, एचएएलचे हेमंत तेलंगी, महेश पगारे, नरहरी राजाचे गौरव बिरारी, मूक बधीरचे सुशांत गालफाडे, यशवंतचे कमलेश परदेशी, मायकोचे संजय पाटील, महिंद्राचे प्रसाद शुक्ल, प्रसाद पंडित आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com