....असे हे शिरस्त्राण पुराण

....असे हे शिरस्त्राण पुराण

नाशिक | वैभव कातकाडे Nashik

आटपाट नगर होते. त्या नगरात सारे अलबेल पाहिजे असा राजाचा अट्टाहास होता आणि त्यादृष्टीने राजाने सगळे प्रधान कामाला लावले होते. त्या प्रधानांमधील एका प्रधानाने अनोखे फर्मान काढले. राज्यातील सर्वांनी प्रवास करत असताना शिरस्त्राण घालावे अन्यथा प्रवास करताना सोबत असलेल्या घोड्याला चारा मिळणार नाही...

या फर्मानाचे संमिश्र परिणाम जनतेमध्ये बघायला मिळाले. काहींना वाटले आपला प्रधान किती चांगला आहे. त्याने जनतेच्या काळजीसाठी किती चांगला निर्णय घेतला आहे. तर काहींना वाटले कशाला पाहिजे ही झंझट; आम्ही नाही ऐकणार असे म्हणत त्यांनी नकारात्मक सूर दाखवला. प्रधान मात्र स्वतःच्या निर्णयावर ठाम होता. त्याने काही केल्या ही मोहीम पार पाडायचीच, अशी खूणगाठ बांधली. राज्यातील जनतेला त्याने सांगितलेच पण चारा देणार्‍या ठेकेदारांनादेखील तंबी दिली. जर तुम्ही शिरस्त्राण नसलेल्याच्या घोड्याला चारा द्याल तर तुम्हास शिक्षेस पात्र व्हावे लागेल.

ठेकेदार मंडळी घाबरली, चूक नागरिकांनी करायची आणि शिक्षेस आपण पात्र व्हायचे हा कुठला न्याय? सर्व चारा ठेकेदार प्रधानाला भेटायला गेले. प्रदीर्घ चर्चा झाली. काही केल्या प्रधान आपली मोहीम मागे घ्यायला तयार नाही हे ठेकेदारांच्या लक्षात आले. मग त्यांनी एक युक्ती केली. जर आम्ही शिरस्त्राण नसलेल्याला चारा दिला तर तुम्ही आम्हाला शिक्षा देणार असाल तर तुमचा एक सेवक आमच्या चारा देण्याच्या ठिकाणी ठेवायला हवा. प्रधानाने लगेचच ही अट मान्य केली. आता मात्र चारा ठेकेदारांकडे मोहीम राबवण्याशिवाय गत्यंतर उरले नाही.

राजाच्या उपस्थितीत मोहीम सुरू झाली. राजाने प्रातिनिधिक शिरस्त्राण असलेल्या नागरिकाच्या घोड्याला चारा देऊन प्रातिनिधिक उद्घाटनदेखील केले. जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा संदेशही सगळीकडे गेला. एका बाजूला सगळे चांगले दिसत होते. दुसर्‍या बाजूला चारा ठेकेदाराच्या दुतर्फा शिरस्त्राण विक्रीसाठी व्यावसायिक बसू लागले. अर्थातच त्यांचा दर्जा कमीच होता, पण वेळ मारून नेणे हा एकमेव उद्देश असल्याने यात कसलीच लाज त्यांनी बाळगली नाही. प्रधानाच्या हे लक्षात येत होते. मात्र गालातल्या गालात हसत अर्थचक्र देखील सुरळीत होत असल्याचे बघून तो मनोमन सुखावला.

काही ठिकाणी चारा दिला नाही म्हणून ठेकेदार आणि जनता यांच्यात बाचाबाची होऊ लागली. दोन दोन शब्द झाल्याने गोष्ट हमरीतुमरीवर आली. नव्हे तर गोष्ट आता हात उचलण्यापर्यंत पोहोचली. झाले.. जे नको व्हायला होते ते झाले.. आता चारा ठेकेदारांना वाटले की हे बघून तरी प्रधान ही मोहीम थांबवेल.

मात्र खूणगाठ पक्की बांधलेला प्रधान तडक ज्या ठेकेदाराला मारहाण झाली तिथे पोहोचला आणि त्याने मी तुमच्या पाठीशी खंबीर आहे. तुम्ही तुमचे योग्य काम सुरू ठेवा अशा शब्दांत आधार दिला. फक्त शाब्दिक आधार देऊन प्रधान थांबला नाही तर मारहाण करून मोहिमेला अडथळा आणणार्‍यांना कायद्याचा बडगा दाखवला आणि आता चारा ठेकेदारांना शिक्षा न देता मारहाण करणार्‍यांना त्याच चारा स्थानकाजवळ हातात फलक घेऊन शिरस्त्राण वापरा, त्यामुळे आपला जीव वाचतो, असा संदेश जनतेला देण्याची शिक्षा सुनावली.. आता बोला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com