पेस्ट कंट्र्रोल ठेका संशयाच्या भोवर्‍यात
नाशिक

पेस्ट कंट्र्रोल ठेका संशयाच्या भोवर्‍यात

शिवसेना राज्य शासनाकडे दाद मागणार

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिकेच्या पेस्ट कंट्रोल ठेकेदाराला दिलेली मुदतवाढ व नवीन निवीदा प्रक्रियात वाढविण्यात आलेल्या दरासंदर्भात ठेकेदार व पदाधिकार्‍यांसंदर्भात संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे.

या एकुणच प्रकारात प्रशासनाने ठेक्यासंदर्भात उपस्थीत झालेल्या प्रश्नांचा खुलासा करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापालिका प्रशासनाला केला आहे.

या गंभीर प्रकारासंदर्भात खुलासा न झाल्यास राज्य शासनाकडे दाद मागितली जाईल, असेही शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

मागील ठेकेदारांला पेस्ट कंट्रोलचा ठेका देण्यात आला होता, त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी असतांना आणि त्याचे काम रद्द करण्यासंदर्भात स्थायी समितीत ठराव झालेला असतांना या ठेकेदाराला बेकायदेशिरपणे कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसेच नवीन प्रक्रिया राबवितांना अटी शर्तीची पुर्तता होत नसतांना व निवीदा समितीचा आक्षेप असतांना मागीलच ठेकेदारांला पुन्हा काम देण्याचा प्रयत्न केला जात असल्याकडे बोरस्ते यांनी लक्ष वेधले आहे.

सत्ताधारी व शिवसेना यांचा यात सहभाग असल्याचे सांगितले जात असुन सेना अशा प्रवृत्तीस पाठींबा देत नसल्याचे स्पष्ट करीत बोरस्ते यांनी प्रशासनाकडुन पेस्ट कंट्रोल ठेक्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहे.

या संशयाच्या भोवर्‍यास सापडलेल्या पेस्ट कंट्रोल ठेक्याच्या प्रक्रियांची संपुर्ण माहिती मिळावी. यासंदर्भात वस्तुनिष्ठ व कागदपत्रासह खुलासा न झाल्यास शिवसेना राज्य शासनाकडे दाद मागेल, असा इशारा विरोधी पक्षनेते बोरस्ते व शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी दिला आहे. याच संदर्भात त्यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना पत्र दिले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com