नाशिकरोड | प्रतिनिधी

जेलरोडच्या पंचक येथे स्त्री जातीच्या अर्भकाला निर्दयी मातेने चेंबरमध्ये फेकून दिल्याचे आढळले. नागरिकांनी वेळीच हालचाल केल्याने ही बालिका वाचली. नाशिकरोड पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मातेचा ठावठिकाणा लागला आहे...

दुसरीही मुलगीच झाली म्हणून निर्दयी आईने एक दिवसाचे स्त्री अर्भक चेंबरमध्ये टाकून दिले होते. चेंबरमध्ये अडकल्याने ते वाचले. माजी नगरसेवक सुनील बोराडे यांनी नागरिकांच्या मदतीने वेळीच हालचाल केली.

पंचक येथील महादेव मंदिरामागील दशक्रिया विधी शेडकडे जाणा-या रस्त्यावर ड्रेनेजचे चेंबर आहे. त्यातून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज तेथे दुपारी खेळत असलेल्या मुलांना आला. कपड्यात गुंडाळलेले स्त्री अर्भक दिसले.

नदीवर जाणा-या कोळ्याला मुलांनी ही माहिती दिली. त्याने परदेशी कुटुंबाच्या मदतीने माजी नगरसेवक सुनील बोराडे यांना ही बाब सांगितली.

बाळ ड्रेनेजमध्ये वाहून जाण्याच्या आधीच बोराडे यांनी भूषण परदेशी, जंगल बर्डे आदींच्या मदतीने हालचाल करुन त्याला बाहेर काढले. बोराडे यांनी महापालिकेच्या पंचक दवाखान्यात त्याला नेले असता तेथील नर्सनी सांगितले की, या दवाखान्यात कालच बाळाचा जन्म झाला. या बाळाला आईसह आज मंगळवारी सकाळी अकराला डिस्चार्ज देण्यात आला होता.

दवाखान्याच्या नोंदीवरुन आई जेलरोडच्या भगवती लॉन्स परिसरात राहत असल्याचे समजले. पोलिसांनी याची माहिती मिळताच ते दाखल झाले. त्यांनी बाळाला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले.