जिल्हा बँक निवडणूक : अन् इच्छुकांच्या गुडघ्याचे बाशिंग क्षणार्धात उतरले

जिल्हा बँक निवडणूक : अन् इच्छुकांच्या गुडघ्याचे बाशिंग क्षणार्धात उतरले

सिन्नर | प्रतिनिधी Nashik

प्रशासक नेमलेल्या नाशिक जिल्हा बँकेसह राज्यातील सोलापूर नागपूर बुलढाणा जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर 31 मार्च 2022 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने 27 ऑगस्ट रोजी घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्हा बँक निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे....

कोरोणाच्या संकटामुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकासह सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑगस्ट 2021 पर्यंत स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र, स्थगितीस पंधरा महिन्यांचा कालावधी उलटल्याने, निवडणुकीस पात्र असणाऱ्या राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या होत्या, त्या टप्प्यापासून पुढे सुरू करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना सहकार विभागाने दिल्या होत्या.

मात्र, राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली असून संचालक मंडळाने राजीनामा दिल्याने त्यांच्यावर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. हे प्रशासक अथवा प्रशासक मंडळ बँकेचे आर्थिक व्यवहार सुरळीत पार पाडत असल्याने त्यांना काम करण्यासाठी अजून काही कालावधी लागण्याची आवश्यकता आहे.

त्यामुळे काही बॅंकांनी त्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती शासनाला केली होती. त्याची दखल घेत राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांच्या सहीने चार जिल्हा बँकांच्या निवडणुका 31 मार्च 2022 पर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश देण्यात आला आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे बँकेचे व्यवस्थापन मागील तीन वर्षांपासून अधिक काळ संचालक मंडळाच्या ताब्यात होते. संचालक मंडळाच्या या कार्यकाळात बँकेची आर्थिक स्थिती अजून खालावली असल्याचा निष्कर्ष सहकार विभागाने काढला आहे.

सन 2017 ते मार्च 2021 पर्यंत जिल्हा बँक रिझर्व्ह बँकेद्वारे विहित केलेली नऊ टक्के भांडवल पर्याप्तता राखू शकलेली नाही. त्यामुळे बँकेकडून बँकिंग नियमन अधिनियम 1949 चे कलम 11 मधील तरतुदींचे उल्लंघन होत आहे. त्याचप्रमाणे बँक परवान्यासाठी आवश्यक अहर्ता निकष बँक पूर्ण करू शकत नसल्याने बँकेचा बँकींग परवाना धोक्यात आला आहे.

बँकेच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करून बँक पूर्वपदावर आणण्यासाठी बँकेवर नियुक्त केलेले प्रशासक मंडळ आणखी काही कालावधीसाठी राहणे आवश्यक असल्याचे मत सहकार विभागाने या आदेशात नोंदवले आहे.

या कालावधीत प्रशासक मंडळास थकीत कर्जाची वसुली, भांडवल पर्याप्ततेमध्ये सुधारणा, बँकिंग व्यवसायात वाढ, त्याचप्रमाणे बँकेच्या कामकाजामध्ये व्यावसायिक व्यवस्थापन आणण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलणे आवश्यक असल्याने, बँकेची निवडणूक 31 मार्च 2022 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशासक मंडळात मंडळास पुरेसा कालावधी मिळाल्यास बँकेची कमकुवत आर्थिक परिस्थिती मूळपदावर आणणे, थकीत कर्जाची वसुली करणे, पर्याप्ततेमध्ये सुधारणा करणे, बँकिंग व्यवसाय वाढवणे, व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापन करणे, संचित तोटा कमी करणे, थकबाकीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावशाली उपाय योजना करणे शक्य होईल व बँका आर्थिक सुस्थितीत येण्यास मदत होईल, ही वस्तुस्थिती विचारात घेऊन विशेष बाब म्हणून नाशिकसह सोलापूर, नागपूर व बुलढाणा या चार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका, ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर, 31 मार्च 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com