प्रतिनिधी| आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तयारीला लागली असून विभाग निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

यातील नाशिकरोड विभागाची बैठक आज (दि.२०) राम मंदिर, देवळाली गांव येथे घेण्यात आली. या बैठकीत युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले.

नाशिक महानगरपालिका निवडणुकीस सव्वा वर्ष शिल्लक राहिले असून महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोर्चेबांधणीच्या तयारीला लागली असून युवक पदाधिकाऱ्यांनीही बैठकांचा धडाका लावला आहे. केंद्र प्रमुख व बूथ प्रमुख यांच्या नेमणूकीसाठी व व प्रभागातील समस्या सोडवून सत्ताधारी भाजपाला धारेवर धरण्याची रणनीती आखण्यासाठी या बैठका घेतल्या जात आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याने महापालिका निवडणूकीत पदाधिकारी व कार्यकर्त्याचे मनोबल उंचावले आहे. त्याकरिता पक्षसंघटन वाढविण्यासाठी विभाग निहाय बैठका घेतल्या जात असल्याचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.

यावेळी नाशिकरोड विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे, कार्याध्यक्ष प्रशांत वाघ, शहर पदाधिकारी नियमात शेख, चैतन्य देशमुख, युवक विधानसभा अध्यक्ष राहुल तुपे, युवक विभाग अध्यक्ष सोनू वायकर आदींसह युवक कार्यकारिणी सदस्य व वार्ड अध्यक्ष उपस्थित होते.