नाशिक | संजय पाटील

तात्यासाहेबांचा सहवास म्हणजे आमच्या आयुष्यातील अनमोल ठेवाच होता. ‘गोल्डन गँग’च्या माध्यमातून आमचा तात्यासाहेबांशी संपर्क वुद्धींगत होत गेला. मग नेहमी भेटणे, मनसोक्त गप्पा मारणे, विनोद, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणे, भटकंती करणे, असे उद्योग चालायचे. तात्यासाहेब, मी, अरविंद ईनामदार, शिवाजी तुपे, मोहनभाई तलरेजा, बाळ देशपांडे, सदाशिव थोरात आदी लोकांचा एक ग्रुप होता. त्यांनी या ग्रुपला ‘गोल्डन गँग’ नाव दिले होते. या ग्रुपमध्ये तात्यासाहेब नेहमी रमायचे. भटकंतीला जातांना ते नेहमी गाडीच्या पुढच्या सीटवर डाव्या बाजूला बसत. वणीचा गड, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आमच्या मैफली होत होत्या. वणीच्या गडावरुन दिसणारा मार्कंडेय पर्वत त्यांना खूप आवडायचा. तेथील तलाव ते न्याहाळत बसायचे.....

ती बातमी ऐकून तात्या अस्वस्थ झाले होते!

तात्यांसाहेबांचे घर सर्वांसाठी खुले असायचे. त्यांना प्रत्येकाविषयी जिव्हाळा असायचा. एकदा मी कैलास मानसरोवर यात्रेस गेलो होतो. जाण्याआधी तात्यासाहेबांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. मगच यात्रेला निघालो. त्याचवेळी प्रख्यात नृत्यांगना प्रतिमा बेदी कैलास मानसरोवर यात्रेस गेल्या होत्या. उत्तराखंडमध्ये भूस्खलन होऊन झालेल्या अपघातात त्यांचा व इतर काही जणांचा मृत्यू झाला होता. तात्यासाहेबांना ही बातमी कळली. त्यानंतर ते खूप बेचैन झाले. त्यांची अस्वस्थता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ते बाबा तारवाले यांना घेऊन थेट माझ्या घरी पोहचले. माझ्या पत्नीकडे चौकशी केली. आम्ही सर्व सुखरुप आहेत, हे ऐकून तात्या निश्चिंत झाले आणि समाधानाने घरी परतले, असा त्यांचा प्रेमाचा व जिव्हाळ्याचा अनुभव त्यांच्यासोबत असणाऱ्या प्रत्येकास मिळाला आहे. त्यांनी माझी कामे जवळून पाहिली. तेव्हा ते म्हणायचे, ‘तुझ्यातील वास्तू विशारदता हे एक काव्य आहे.’ त्यांचे हे वाक्य म्हणजे वास्तूविशारदमधील माझ्यासाठी ज्ञानपीठच होते.

ज्ञानपीठनंतर तात्या स्थितप्रज्ञच होते!

तात्यांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हाही ते अगदी स्थितप्रज्ञ होते. त्यांच्यादृष्टीने ती एक घटना होती. त्यांना सत्कारही आवडत नसायचे. परंतु नाशिककरांच्या प्रेमापोटी तेव्हा तात्यांनी गौरव समारंभ करण्यास होकार दिला. या समारंभातील भाषण त्यांनी आधी आमच्या ‘गोल्डन गँग’ला वाचून दाखवले होते. तात्या निशाचर होते, हे सर्वांनाच महिती आहे. त्यांच्या घरी गेल्यावर ते कधी कोणालाही टाळत नसत. दिवसभर येणारे-जाणारे असायचे. यामुळे रात्री १-२ वाजेनंतरच ते लिहित बसायचे.

जे होते ते सामाजास देऊन टाकले!

तात्यांसाहेबांचा दृष्टीकोन खूप वेगळे होता. ते खूप संवेदनशील होते. सामाजिक कार्यात पुढेच असायचे. त्यांच्याकडे जे होते, ते समाजात वाटून दिले होते. तात्यासाहेबांचे स्मारकही कला, संस्कृती साहित्य अशा दृष्टीकोनातूनच उभारले गेले. पुतळ्यास त्यांचा विरोध असायचा. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा पुतळा नाही.

दाल फ्राय तात्यांचा आवडता पदार्थ!

तात्यासाहेबांचे वागणे व स्वभाव लहान मुलांसारखा निरागस होता. माणसांवर ते निष्काम प्रेम करत होते. कधी कोणाच्या उणीवा काढत नव्हते. त्यांच्या सूचनाही सकारात्मक असायच्या. तात्या आमच्यासोबत अनेकवेळा हॉटेलात जेवायला यायचे. त्यांचे जेवणही साधे असायचे. दाल फ्राय हा त्यांचा आवडता पदार्थ होता.

एखाद्या पदार्थात कमतरता असली तर ते कधीच सांगत नव्हते. परंतु तो पदार्थ असा असता तर अधिक चांगला झाला असता असे सांगायचे. कारण कोणाला दुखावणे त्यांच्या स्वभावातच नव्हते.

(लेखक ज्येष्ठ वास्तू विशारद आहेत.)