नाशिक | प्रतिनिधी

९४ व्या अखिल भारतीय संमेलनाच्या तयारीसाठी लागणाऱ्या निधीसाठी स्वागताध्यक्ष तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आवाहनास आतापर्यंत सर्वपक्षीय एकूण १४ लोकप्रतिनिधींनी प्रतिसाद दिला आहे. संमेलनास जिल्ह्यातील आमदार निधीतून बहुतेकांनी प्रत्येकी १० लाख तर जिल्ह्याबाहेरील दोघांनी पाच लाखाचा निधी देण्याची तयारी दर्शविली आहे...

यंदा विविध कारणांस्तव संमेलन खर्चात मोठी वाढ होणार आहे. यामुळे संमेलनाचे अंदाजपत्रक तीन ते साडेतीन काेटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. शासनाने संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती.

मात्र अद्याप त्याचे पुढे काय झाले याबाूत माहिती मिळालेली नाही. संमेलनाच्या खर्चाचा भार पेलण्यासाठी नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठकीत पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी सर्वपक्षीय आमदारांना स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी १० लाखाचा निधी देण्याचे आवाहन केले होते.

उपस्थित लोकप्रतिनिधींनी त्यास संमती दर्शविली होती. या अनुषंगाने १० दिवसांत १२ आमदारांनी जिल्हा नियोजन विभागास पत्र देऊन निधी देण्याची तयारी दर्शविली आहे.

यामध्ये पालकमंत्री भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, दिलीप बनकर, दिलीप बोरसे, नितीन पवार, सुहास कांदे, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर, हिरामण खोसकर, डॉ. सुधीर तांबे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील विधान परिषदेचे दोन तर विधानसभेच्या चार अशा एकूण सहा आमदारांचे पत्र अद्याप आलेले नाही. जी पत्र प्राप्त झाली, त्यातील दोन आमदारांनी प्रत्येकी पाच लाखाचा निधी देण्याची तयारी दाखविल्याचे कळते.