मालेगाव | प्रतिनिधी

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची नाना पटोले यांनी सूत्र हाती घेताच मालेगावमध्ये कॉंग्रेसला मोठे भगदाड पडल्याचे चित्र दिसून येत आहे. माजी आमदार आसिफ शेख यांनी पटोले यांच्याकडे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला. तर माजी आमदार शेख राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे...

माजी आमदार शेख यांनी का राजीनामा दिला असावा याबाबत तर्क वितर्कांना मालेगाव शहरासह राजकीय वर्तुळात उधान आले आहे.

राज्यात संवेदनशील अशी ओळख असलेल्या मालेगाव मध्य काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या पंचवार्षिक पासून इथे एमआयएमची सत्ता असली तरीदेखील माजी आमदार आसिफ शेख यांनी मालेगाव मनपावर सत्ता कायम ठेवली आहे.

1999 च्या विधानसभा निवडणुकीत रशीद शेख यांनी आपल्या निहाल अहमद यांना धोबीपछाड देत विधानसभा गाठली. 2004 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळत निहाल अहमद यांचे मतदारसंघावर असलेलं वर्चस्व संपुष्टात आणून मतदारसंघ कॉंग्रेसमय केला होता.

मुस्लीम समाजाचे 80 टक्के प्रभुत्व असलेल्या या मतदारसंघात आमदार रशीद शेख यांच्या काळात महापालिका निवडणुका झाल्या आणि त्यांनी महापौरपदी आपला मुलगा आसिफ शेख याची वर्णी लावत शहरावर आपली पकड मजबूत केली होती.

2014 साली मात्र रशीद शेख यांनी निवडणूक न लढवता आपला मुलगा आसिफ शेख याला निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले. 2014 सालच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मौलाना मुफ्ती यांचा पराभव करत आसिफ शेख विजयी झाले होते.

दरम्यान, माझ्या मुलाने जो राजीनामा दिला आहे तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी कॉंग्रेसमध्ये होतो आणि राहील अशी प्रतिक्रिया माजी आमदार आसिफ शेख यांचे वडील शेख रशीद यांनी देशदूतशी बोलताना दिली आहे.