'महाकार्गो'त सुविधांची वानवा; उत्पन्नावरही परिणाम

एसटी कर्मचाऱ्यांचा अडचणींचा प्रवास
'महाकार्गो'त सुविधांची वानवा; उत्पन्नावरही परिणाम

नाशिक | प्रतिनिधी

उत्पन्नवाढीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून माल वाहतूक सेवा अर्थात महाकार्गो सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, अपुऱ्या सुविधांमुळे या सेवेतील कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत. त्यातच एसटी प्रशासनाकडूनही मालवाहतूक सेवेच्या त्रुटींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा न पुरविण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेने केली आहे...

एसटीच्या मालवाहतूक ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरला जात असल्याने उत्पन्नावर परिणाम होत आहे. दोन किलोमीटरपेक्षा कमी अंतरासाठी चालकासोबत सहकर्मचारी दिला जात नसल्याने मालाची चढ-उतार करताना तसेच गाडी मागे-पुढे घेताना अडचणी निर्माण होतात.

एका विभागातील मालवाहतूक ट्रक अन्य विभागात गेल्यास कर्मचाऱ्यांना दोन दिवसांपेक्षा जास्त थांबवून घेऊ नये, अशा सूचना असतानाही प्रत्यक्षात ४ ते ५ व त्यापेक्षा अधिक दिवस कर्मचाऱ्यांना थांबून राहावे लागते.

तसेच त्या ठिकाणी राहण्याची व नाष्टा-जेवणाची व्यवस्था केली जात नसल्याने कर्मचारी हैराण झाले आहेत. लॉकडाऊनमुळे गाडी रखडल्यास कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटी जागेवरच घेण्याची सक्ती केली जाते. तसेच, अन्य विभागात असणारी मालवाहतुकीची गाडी तेथून पुढे मालवाहतूक करण्यासाठी मूळ विभागातून कर्मचारी पाठविले जातात.

तर, एसटीच्या परिपत्रकीय सूचनेप्रमाणे त्या त्या विभागातील कर्मचाऱ्यांनी पुढची वाहतूक करण्याच्या सूचना असतानाही मूळ विभागातील कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने खासगी गाडीने प्रवास करून मालाच्या ट्रकपर्यंत पोहोचावे लागते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

खासगी गाड्यांचा आधार

सध्या राज्यात सर्वत्र लॉकडाऊन लागू असल्याने एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामुळे मालवाहतूक सेवेतील कर्मचाऱ्यांना माल पोहोचून मूळ विभागात परतताना खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागतो. संबंधित कर्मचाऱ्यांना पदरमोड करत स्वखर्चाने घरी परतावे लागते. तसेच हॉटेल व्यवसाय बंद असल्याने नाष्ट्यासह जेवण मिळत नसल्याची ओरड ऐकण्यास मिळत आहे.

मालवाहतूक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुक्कामासाठी लागणारा वेळ व नाष्टा-जेवणाची होणारी गैरसोय विचारात घेऊन दररोज तीनशे रुपये विशेष भत्ता देण्यात यावा. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी राहण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात यावी.

संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com