मुख्यमंत्र्यांनी साधला शिवसेना जिल्हाप्रमुखांशी संवाद

मुख्यमंत्र्यांनी साधला शिवसेना जिल्हाप्रमुखांशी संवाद

नाशिक । प्रतिनिधी

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुखासोबत चर्चा करून प्रत्येक जिल्ह्यातील करोना संसर्गाबाबतची माहिती जाणून घेतली. नाशिक जिल्हा रेड झोन मध्ये असून मविप्र संस्थेच्या आडगाव येथे सुरू करण्यात आलेल्या टेस्टिंग लॅब गेल्या चार दिवसांपासून स्वाब टेस्टिंग किट च्या कमतरतेमुळे बंद असल्याची माहिती जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. याठिकाणी स्वब टेस्टिंग किट देखील उपलब्ध नसून लवकरात लवकर टेस्टिंग किट उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

मालेगाव मधील वाढत्या करोना ग्रस्तांमुळे नाशिक जिल्ह्याची संख्या रोजच वाढत आहे, मालेगाव मधून मोठ्या प्रमाणात जनता नाशिक शहर व आजूबाजूच्या परिसरात लपून छपून येत असल्याने शहरातही करोना ग्रस्तांची संख्या वाढायला सुरवात झाली आहे, त्याचप्रमाणे मालेगाव प्रमाणे नाशिक शहरात देखील झोपडपट्टी परिसर असून प्रामुख्याने तेथेच रुग्ण वाढायला सुरवात झाली आहे.

त्यामुळे वेळीच या अनधिकृत लोकांच्या येण्याजाण्यावर प्रतिबंध लावण्यात यावे जेणे करून किमान नाशिक शहरातील रुग्णांमध्ये वाढ होणार नाही. मालेगाव मधील करोना ग्रस्तांची संख्या रोजच वाढत आहे तेथील रुग्णनांची चाचणी ही आडगाव येथील लॅब मध्ये केली जात आहे, त्याअनुषंगाने आडगाव येथील लॅबच्या मागणी नुसार लवकरात लवकर टेस्टिंग साहित्य उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय होत असताना शिवसेना नाशिकच्या वतीने शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात शेतमाल घेऊन प्रायोगिक तत्वावर तो मुंबई मधील अनेक परिसरात पोहचवला जात असल्याची माहिती करंजकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असून शेतकऱ्यांचा शेतमाल योग्य दारात थेट ग्राहकांना मिळवून दिल्यास मध्यस्थी दलालांचा नायनाट होईल व त्याचप्रमाणे प्रायोगिक तत्वावर सुरू असलेली ही शेतमाल पोहचवण्याची प्रक्रिया शिवसेनेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात राबवावी अशी मागणीदेखील केली.

तसेच नाशिक शहरातील वय ४५ च्या आतील प्रायव्हेट डॉक्टर, नर्सेस, चांगली शरीरयष्टी असलेले लोक जे स्वइच्छेने या संक्रमण काळात काम करू इच्छिता त्यांना संपूर्ण पीपीई किट व इतर साहित्य उपलब्ध करून कोविडयोद्धा म्हणून लोकसेवा करण्याची संधी दिली जाणार असून अशा नागरिकांची माहिती उद्धव ठाकरे यांना पाठवायची आहे. तरी इच्छुकांनी आपली नावे जिल्ह्यातील शिवसेना कार्यालय येथे नोंदवावी असे आवाहन केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com