करोनाच्या पार्श्वभूमीवर चालकांअभावी ट्रान्सपोर्ट व्यवसाय पूर्णपणे अडचणीत
नाशिक

करोनाच्या पार्श्वभूमीवर चालकांअभावी ट्रान्सपोर्ट व्यवसाय पूर्णपणे अडचणीत

Abhay Puntambekar

करोनाच्या काळात ट्रक चालकांना प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी

नाशिक । प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर चालकांअभावी ट्रान्सपोर्ट व्यवसाय पूर्णपणे अडचणीत आला असून करोनाच्या काळात ट्रक चालकांना प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व गुडस ट्रान्सपोर्ट यांच्यावतीने करण्यात आली आहे.याबाबत राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब व आयमा, निमा या संघटनांना पत्र देण्यात आले असल्याची माहिती नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष सुभाष जांगडा सेक्रेटरी शंकर धनावडे नाशिक गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी.एम.सैनी यांनी दिली आहे.

नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व नाशिक गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात आणि राज्यात कोविड -१९ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू असून देशात अत्यावश्यक सेवेत ट्रान्सपोर्ट क्षेत्र आपली महत्वाची भूमिका पार पाडत आहे. मात्र या काळात ट्रान्सपोर्ट क्षेत्रापुढे अनेक आव्हाने उभी राहिली असून प्रसंगी ट्रान्सपोर्ट क्षेत्र अडचणीत आले आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणारे ट्रक चालक मालाची वाहतूक करत असतांना आपला जीव धोक्यात घालून काम करत असतांना प्राथमिक सुविधांअभावी तसेच त्याला मिळत असलेल्या तुच्छ वागणुकीमुळे चालक काम करायला तयार होत नसून प्रसंगी अनेक ट्रान्सपोर्ट बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बाजवणाऱ्या ट्रान्सपोर्ट क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोनाच्या काळात रस्त्यावरून वाहतूक करत असतांना हायवेवर तसेच औद्योगिक वसाहतीत अन्न, पाणी यासह इतर प्राथमिक सुविधा देखील मिळत नाही आहे. मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला मालाची वाहतूक करून घेऊन गेल्यानंतर कंपनीत लगेच प्रवेश दिला जात नाही. तासंतास आपले वाहन घेऊन त्याला बाहेर ताटकळत उभे रहावे लागत आहे. या काळात त्याला पिण्याचे पाणी तसेच जेवण देखील उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच याठिकाणी ट्रक चालकांना हीन स्वरूपाची वागणूक देण्यात येत असल्याने कोणीही ट्रकचालक कामावर येण्यास तयार नाही त्यामुळे ट्रान्सपोर्ट क्षेत्र अडचणीत आले असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे कोरोनाच्या काळात प्राथमिक सुविधांअभावी ट्रान्सपोर्ट क्षेत्रात निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या या ट्रक चालकांना अन्न, पाणी, स्वच्छता या प्राथमिक सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच एमआयडीसीत माल घेऊन पोहचल्यावर ट्रक चालकांना तात्काळ कंपनीत प्रवेश देऊन त्यांना प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना कंपनी चालकांना द्याव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com