‘क्लाऊड फिजिशियन’ उपक्रमाचे आज उदघाटन

मानसिक आजारांवर समुपदेशन करण्यात येणार
‘क्लाऊड फिजिशियन’ उपक्रमाचे आज उदघाटन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

रुग्णांचे चोवीस तास मॉनिटरींग करण्यासाठी ‘क्लाऊड फिजिशियन’ असे दोन उपक्रम सुरु करण्यात येणार स्वातंत्र्य दिनी (दि.१५ ऑगस्ट )विभागीय आयुक्त कार्यालयात होणा-या स्वातंत्रदिन कार्यक्रमात सकाळी ९.३० वाजता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने याचे उदघाटन करण्यात येणार आहे.

नाशिक जिल्हयात ग्रामीण भागामध्ये करोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय यांच्यावतीने करोनाविरुध्द लढाई सुरू आहे. यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आता त्यापुढे पाऊल टाकत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत संवाद व समुपदेशनाव्दारे करोनाविषयीची भिती दुर करण्यासाठी ‘ई- साय क्लिनिक’ तर शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णांचे चोवीस तास मॉनिटरींग करण्यासाठी ‘क्लाऊड फिजिशियन’ असे दोन उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

करोनाच्या संकटकाळात लॉकडाऊनमध्ये व्यवहार बंद झाल्याने वैयक्तिक, सामाजिक व आर्थिक पातळीवर विविध प्रश्न निर्माण झाले असून मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होत असल्याने त्यातून अनेक मानसिक आजार होण्याची भिती आहे.यासाठी करोनाच्या संकटकाळामध्ये करोना रुग्ण तसेच आरोग्य, पोलीस विभागातील सेवकांसह जिल्हयातील नागरिकांचे मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोगय विभाग व “ई-साय क्लिनिक” यांचे संयुक्त विद्यमाने आनंदी मन, सुदृढ शरीर असा नाविन्यपूर्ण उपक्रम नाशिक जिल्हयात सुरू करण्यात येणार आहे. आठवडयातील सातही दिवस चोवीस तास ७३०३२५०५१५ या निशुल्क क्रमांकावर मानसिक आजारांवर समुपदेशन करण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने व बंगलोर येथील डॉ. ध्रुव जोशी व डॉ. रमण (व्हेंटिलेटर तज्ञ) यांच्या सहयोगाने ‘क्लाऊड फिजिशियन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये बंगलोरमधील पथकाव्दारे जिल्हयात अतिदक्षता विभागात उच्च दर्जाचे कॅमेरे बसवून या कॅमेऱ्याव्दारे चोवीस तास रुग्णांवर बंगलोर येथील क्लाऊड फिजिशियन लक्ष ठेवणार असून त्यांना रुग्णांची स्क्रीनवर प्रत्यक्ष स्थिती बघून उपचारासाठी मार्गदर्शन करता येणार आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील २० बेड व २० व्हेंटिलेटरचे या फिजिशियनकडून सनियंत्रण करण्यात येणार आहे.

दोन्हीही उपक्रम अतिशय नाविन्यपूर्ण व महत्वाचे असून नागरिकांचे मानसिक स्वास्थ सुदृढ राहावे, रुग्णांचे प्राण वाचावेत यासाठी तंत्रज्ञान व तज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय सेवा यांच्या समन्वयातून जिल्हयात सदरचे उपक्रम राबविण्यात येणार असून या दोन्ही उपक्रमांना बंगलोर स्थित ‘एसीटी’ या संस्थेने आर्थिक सहाय्य केले आहे. १५ ऑगस्ट रोजी जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी ९.३० वाजता उपक्रमांचा औपचारिक शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com