आता पुरात शाळा बुडणार नाही; शिक्षणही थांबणार नाही!

आता पुरात शाळा बुडणार नाही; शिक्षणही थांबणार नाही!

किसनलालजी सारडा प्रतिष्ठानतर्फे जलालपूरला नव्या शाळेचे लोकार्पण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

''गोदावरीच्या पुरात शाळा अनेकदा पाण्याखाली जायची. मुलांचे शिक्षण थांबायचे. एकदा तर शाळेचे रेकॉर्डही वाहून गेले आणि वर्गखोल्या खराब झाल्या. आज शाळेच्या नव्या इमारतीमुळे ही अडचण कायमस्वरूपी दूर झाली आहे. आमच्या गावातील मुले आता सुरक्षितपणे शिकतील. त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल...'' ही कृतज्ञतेची भावना बोलून दाखविली जलालपूरच्या ग्रामस्थांनी. निमित्त होते किसनलालजी सारडा प्रतिष्ठानने बांधलेल्या मातोश्री रामप्यारीबाई सारडा जिल्हा परिषद शाळेच्या आधुनिक इमारतीच्या येथील लोकार्पण सोहळ्याचे...

कोरोनाचे नियम पाळत मोजक्या लोकांमध्ये गंगापूरजवळील जलालपूर गावी हा सोहळा रविवारी (दि. ११ जुलै) संपन्न झाला. जलालपूर गावचे ज्येष्ठ नागरिक निवृत्तीबाबा फडोळ यांच्या हस्ते शाळेच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सारडा उद्योग समूहाचे अध्यक्ष किसनलालजी सारडा होते. यावेळी गावच्या सरपंच हिराबाई गभाले, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मोतीराम रानडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष निवृत्ती रानडे, केंद्रप्रमुख साहेबराव देवरे, सारडा परिवाराचे सदस्य किरणदेवी सारडा, सारडा समुहाचे कार्यकारी संचालक श्रीरंग सारडा यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे शिक्षक आणि निवडक ग्रामस्थ उपस्थित होते.

जलालपूर येथे पहिली ते चौथीची जिल्हा परिषद शाळा आहे. मात्र गोदाकाठी असल्याने अनेकदा आलेल्या पुरामुळे वर्गखोल्यांची दुरावस्था झाली. परिणामी मुलांच्या शिक्षणात अडसर येत होता. ही बाब ग्रामस्थांकडून समजल्यानंतर उद्योजक किसनलालजी सारडा यांनी ‘सारडा प्रतिष्ठान’च्या माध्यमातून अवघ्या दीड वर्षांच्या काळात दोन प्रशस्त वर्गखोल्या, संगणक कक्ष आणि कार्यालयासाठी प्रत्येकी एक खोली, प्रसाधन गृहाच्या सुसज्ज सोयीसह नवी शाळा बांधून दिली.

त्यासाठी सुमारे 40 लाखांचा खर्च आला. शाळेत पाण्याची टाकी, वीजेचे दिवे आणि पंख्यांचीही सोय करण्यात आली आहे. गोदावरीच्या पुराचे पाणी पोहाचणार नाही, अशा उंच ठिकाणी नवी इमारत बांधली असून भविष्यात येथील मुलांना विनाअडथळा आणि निर्भयपणे येथे शिक्षण घेता येणार आहे.

‘जलालपूर हे आमच्या मातोश्री रामप्यारीबाई सारडा यांचे गाव होते. त्यामुळे गावाबद्दल पहिल्यापासूनच आपुलकी आहे. त्याकाळी महिलांच्या शिक्षणाची सोय नव्हती, मात्र तरीही आमची आई वाचायला शिकली.

ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ तिचा तोंडपाठ होता. अध्यात्माचा वारसा तिच्याकडूनच आम्हाला मिळाला. त्यातूनच तिच्या गावी ही शाळा उभारण्याची प्रेरणा मिळाली, असे मनोगत किसनलालजी सारडा यांनी यावेळी व्यक्त केले. शाळा उभारणीच्या निमित्ताने गावाने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, त्याचा आनंद वाटतोय, असे श्रीरंग सारडा यांनी सांगितले.

मुलांच्या शिक्षणाची मोठी अडचण या सुसज्ज शाळेमुळे दूर झाली आहे. त्यामुळे जलालपूरच्या येणाऱ्या पिढ्या तुम्हाला कायम लक्षात ठेवतील अशी भावना सरपंच सौ. हिराबाई गभाले यांच्यासह निवडक ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

दरम्यान मातोश्री रामप्यारीबाई सारडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि दीप प्रज्वलनाने लोकार्पण सोहोळ्याला सुरूवात झाली. यावेळी जलालपूरच्या ग्रामस्थांनी किसनलालजी सारडा यांच्यासह सारडा कुटुंबियांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com