जानोरी | वार्ताहर

राज्याची विधानसभा आज संपूर्ण सुरक्षिततेची दक्षता घेवून कामकाज चालू शकते. मग कादवा कारखानाची सभा का होवू शकत नाही. असा सवाल शिवसेना नेते सुरेश डोखळे यांनी व्यक्त करत शेतकऱ्यांच्या प्रश्नापासुन पळ काढण्यासाठी कादवा साखर कारखान्याच्या विद्यमान चेअरमन यांनी ऑनलाइन सभा घेत एक अजब इतिहास नोंदवला असल्याची टीका करण्यात आली...

ऑनलाईन सभेतून बिगर सभासदांच्या हस्तक्षेपाने विषयांना मंजुरी देण्यात आली. याचा निषेध नोंदवण्यासाठी शेतकरी सभासदांनी उसाच्या शेतातच निषेध सभा घेत ऑनलाइन सभेचा निषेध केला.

कादवा साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे ठरवून गुरुवार ४ मार्च रोजी ऑनलाइन सभा घेण्यात आली. कादवा कारखानाच्या समोरच निषेध सभा घेण्याची तयारी विरोधक ऊस उत्पादक सभासदांनी केली होती.

परंतु कादवा साखर कारखान्यांच्या परिसरात १४४ लागू करून पोलिसांनी ही सभा उधळून लावली. यावेळी लखमापूर येथील उसाच्या शेतात ऊस उत्पादक सभासदांनी निषेध सभा घेतली.

ऑनलाइन सभा म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पळ काढण्याचा प्रयत्न करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येवून या हुकुमशाही विरोधात एकवटून प्रखरपणे विरोध करावा असे आवाहन ऊस उत्पादकांनी ऊसाच्या शेतात सभा घेऊन कादवा कारखान्याच्या ऑनलाईन सभेला विरोध केला.

संपूर्ण शेतकरी सभासद वर्ग सुशिक्षित आहे असे नाही. मोबाईलचा वापर करावा कसा? असा प्रश्न सभासदांना पडत असतांना ऑनलाईन सभा घेतली. बिगर सभासदांना ऑनलाईन सभेत बोलण्यास परवानगी देत विषयांना मंजुरी मिळवून घेतली.

विरोध दर्शवलेल्या सभासदांना बोलण्यास संधी दिली नाही ही नक्कीच सभासदांची गळचेपी केली असून याचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधी शेतकऱ्यांनी कादवा साखर कारखान्याविरोधात ऊसाच्या शेतात निषेध सभा घेतली असल्याचे मत यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी कारखान्याच्या दडपशाहीला प्रखरपणे विरोध दर्शविण्यात आला. तालुक्यातील ऊस आहे तसाच पडून उसाचा कडबा तयार झाल्याचे दृश्य असतांना शेजारच्या तालुक्यातुन ऊस आणला जातो.आमचा हक्क असतांना आमच्यावर अन्याय केला जात आहे. कार्यक्षेत्रातील ऊस तसाच पडून रहातो हे नक्कीच अन्यायकारक आहे.

शेतकरी हितासाठी सर्वांनी येवून एक शेतकऱ्यांची वज्रमुठ तयार करून या दडपशाहीला विरोध करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. इथेनॉलच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असून इथेनॉलच्या नावाखाली साखर कारखान्यावर कर्जाचा डोंगर रचला जात असल्याचे चित्र डोळ्यासमोर आहे.

तरी आतातरी एकत्र होवून यांना सत्तेपासून खाली खेचा असे आवाहन यावेळी शिवसेना नेते सुरेश डोखळे,भाजप तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, माजी जि.प.गटनेते प्रवीणनाना जाधव, अॅड.विलास निरगुडे, बाळासाहेब कामाले, सागर जाधव, तुषार वसाळ, संपतराव घडवजे, रविंद्र मोरे, बाळासाहेब देशमुख, सचिन बर्डे, अमोल देशमुख, अक्षय देवरे, गोविंद निमसे आदी शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.