नाशिक | रोहित ताहाराबादकर

नाशिक पासून जवळच असलेल्या कावनाई तिर्थक्षेत्रावर सुटीचा मुहूर्त साधत भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. आधीपासूनच भाविकांच्या आकर्षणाच केंद्रबिंदू ठरत असलेल्या या तीर्थक्षेत्री सुट्टी साधून अनेक पर्यटक भेटी देताना दिसून येतात.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कावनईचा विकास झाल्याने भाविकांचा ओढा गेल्या काही दिवसात वाढला आहे. कावनई येथील श्री कामाक्षी देवी मंदिर प्रसिद्ध आहे. कामाक्षी माता मंदिर, श्री क्षेत्र कावनाई हे भारतातील चार शक्तिपीठांपैकी क्रमांक तीनचे शक्तिपीठ समजले जाते.

कावनई हे ठिकाण सिंहस्थ कुंभमेळा मूलस्थान श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ म्हणून ओळखले जाते. तेथे महादेवाचे मंदिर आहे.

कावनई येथे कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो. येथे पाण्याचे दोन कुंड असून संपूर्ण बांधकाम दगडी आहे. दोन्ही कुंडांना गोमुख आहे. गोमुखातून पाण्याची धार सतत चालू असते. गोमुखाची धार कधीही बंद पडलेली नाही, अशी स्थानिकांची धारणा आहे. या कुंडात स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्य प्राप्त होते, अशी भावना आहे.

'श्री क्षेत्र कावनई' हे नाशिक शहरापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक महामार्गावरून घोटी-इगतपुरीच्या दिशेने जाताना खंबाळे गावाजवळ उजव्या हाताला फाटा फुटतो. तो कावनाई फाटा या नावाने ओळखला जातो.

कावनाई गाव तेथून सात किलाेमीटर अंतरावर आहे. इगतपुरीहून कावनई गावापर्यंतचे अंतर सतरा किलोमीटर आहे. गावात शिरल्यानंतर उजव्या हाताला कावनई गड दिसतो.

कावनाई गावापासून गड चढण्यास सुरुवात करून गडाच्या सोंडेवरून वळण घेत घेत गडावर जाता येते. गड चढून गेल्यावर कड्याजवळ पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर कड्यात मोठा दरवाजा आहे.

सुस्थित असलेल्या त्या दरवाजाजवळ छोटी गुहा आहे. त्यात चार-पाच व्यक्ती बसू शकतील. दरवाज्यातून छोट्या भुयारी मार्गाने कडा चढून गेल्यावर गडाचा प्रशस्त भाग आहे. पश्चिम भागात एक बुरूज आहे.

तेथे पाण्याचे टाके व मंदिर असून टाक्याला उन्हाळ्यातही पाणी असते. त्याचे पाणी दुष्काळातही आटत नाही. गडावरून कळसूबाईची डोंगररांग, त्र्यंबक रांग, त्रिंगलवाडी असा परिसर दिसतो. गडावर भटकंती करून मन प्रसन्न होते.