नाशकात लाॅकडाऊनचा फैसला सायंकाळी ५ वाजता

दोन वेळा बदलली बैठकीची वेळ; नाशिककरांचे लक्ष पालकमंत्र्यांच्या निर्णयाकडे
नाशकात लाॅकडाऊनचा फैसला सायंकाळी ५ वाजता

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्ये करोनाचा विस्फोट झाला असून मागील दोन दिवसांपासून रोज साडेतीन हजार रुग्ण पाॅझिटिव्ह सापडले आहेत. निर्बंध कुचकामी ठरत असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे....

यापार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत व्हिडीओ कॉन्फरन्स होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होईल.

यानंतर पालकमंत्री नाशिकमध्ये लॉकडाऊन करायचे की, नियम पाळून या परिस्थितीला सामोरे जायचे याबाबतचे निर्णय घेणार आहेत. त्यामुळे नाशिककरांचे लक्ष सायंकाळच्या बैठकीकडे लागले आहे.

देशात करोनाने पुन्हा डोकेवर काढले असून चिंतेची बाब म्हणजे एकूण रुग्णसंख्येच्या ७० टक्के पाॅझिटिव्ह महाराष्ट्रात सापडत आहे. देशात करोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या पहिल्या दहा शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील तब्बल ९ शहरांचा समावेश आहे.

कठोर निर्बंध घालूनही करोनाचे संक्रमण रोखण्यात अपयश येत असल्याने महाराष्ट्रातील सर्वाधिक बाधित १० ते १५ जिल्ह्यांमध्ये होळीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण लॉकडाउनची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद, तसेच अमरावती या विभागांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. करोनाचा प्रसार सातत्याने वाढत आहे. स्थानिक पातळीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून अनेक निर्बंध लागू करण्यात आले असले, तरी राज्यासह नाशकात करोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यातच आता येत्या रविवारी (दि.२८) होळी, सोमवारी (दि.२९) धुलिवंदन व शुक्रवार (दि.२ एप्रिल) रोजी रंगपंचमीचा सण आहे. या उत्सवांच्या या कालावधीत करोनाचा फैलाव अधिक होण्याची भीती आहे. त्यामुळे होळीपूर्वीच राज्य सरकार काही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.

नाशिक जिल्ह्यात देखील धोकादायक पध्दतिने रुग्णवाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. आज पालकमंत्री भुजबळ करोना परिस्थितीचा आढावा घेणार असून त्यात लाॅकडाऊनबाबत महत्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे बोलले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com