नाशिक | Nashik

नाशकात तूर्तास लॉकडाऊन करणार नाही. लॉकडाऊनची गरज भासल्यास त्यासाठी अवधी दिला जाईल. अशी माहिती आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. आज जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे नाशिक शहर व जिल्हा कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना याबाबत आढावा बैठक सुरू आहे. यावेळी ते बोलत होते.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पांडेय, मुख्याधिकारी लीना बनसोड, ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, अन्न, औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त डॉ.माधुरी पवार, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निखिल सैंदाने, डॉ.प्रशांत खैरे, डॉ.अनंत पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित आहेत.

यावेळी भुजबळ म्हणाले की, करोनाबाधित रुग्णाचे विलगीकरण व्यवस्थित होत नसेल तर अशा रुग्णांना शोधून काढण्यासाठी महापलिका आणि पोलीस प्रशासन पुढे येऊन कारवाई करणार आहे. अशा रुग्णांना तत्काळ कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तीन दिवसांनी पुन्हा मिटिंग घेऊन त्यांना वाटून दिलेले काम कितपत झाले याचा आढावा आपण घेणार आहे. दवाखाने ताब्यात घेण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यानुसार रुग्ण वाढल्यास त्यांना याठिकाणी दाखल करून घेण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त रुग्णांना घरी उपचार कसे दिले जातील याकडे लक्ष दिले जाणार आहे. दवाखान्यात बेड नसून दिले जात नसतील तर महापालिका अशा रुग्णांवर कारवाई केली जाणार आहे.

युद्ध पातळीवर शहरात 300 बेड वाढविण्यात येणार आहेत. पुढील 8 दिवसात मनपाचे 1 हजार बेड वाढविणार असल्याचे भुजबळ यांनी याप्रसंगी सांगितले.

शहरातील अनेक रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत असे सांगून रुग्णांना बळजबरीने गृहविलगीकरण करण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे रुग्णसंख्या वाढते आहे. तसेच महापालिका रुग्णालयात रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नाही. त्यामुळे नातलगांना थेट करोनावार्डमध्ये जेवण घेऊन जावे लागते.यामुळेदेखील करोनाचे रुग्ण वाढत आहे.

यावरून पालकमंत्री यांनी महापालिका आयुक्तांना धारेवर धरत सांगितले की, माझ्याजवळ महापालिका कमिशनर बसले आहेत. तेच उत्तर देतील. यानंतर दबावात आलेले कैलास जाधव यांनी सांगितले की ठेकेदार नेमला असून त्याच्याकडून प्रत्येक रुग्णाला जेवण देण्याबाबत सांगितले आहे. तरीदेखील काही ठिकाणी अडचणी आलेल्या असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

तसेच अव्वाच्या सव्वा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईची मागणीदेखील करण्यात आली आहे. जेव्हा आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत रुग्णालयातील ८० टक्के बेड आपण ताब्यात घेतो तेव्हा ताब्यात घेतलेल्या बेडवर ज्या रुग्णांवर उपचार होतात. त्यांना कशाप्रकारे बिले आकारली जातात.

या प्रश्नांवरदेखील उत्तर देताना महापालिका आयुक्तांची चांगलीच भंबेरी उडाली. भुजबळांनी दोन वेळा प्रश्न विचारूनदेखील आयुक्त जाधव यांनी सरकारी नियमांना धरून जे ठरलेले बिल असेल तेच घेतले जाईल असे सांगत वेळ मारून नेली. यानंतर भुजबळ यांनीदेखील विषय बदलत आयुक्तांच्या अपुऱ्या माहितीकडे दुर्लक्ष केले.