तब्बल १२ तासांच्या अथक प्रयत्नाअंती गॅस टँकर बाजूला सारण्यात यश

तब्बल १२ तासांच्या अथक प्रयत्नाअंती गॅस टँकर  बाजूला सारण्यात यश

जुने नाशिक | प्रतिनिधी

पूर्वीच वाहतूक कोंडीमुळे चर्चेत असलेल्या द्वारका चौफुलीवर आज पहाटेच्या सुमारास भलामोठा टँकर पलटी झाल्यामुळे दुपारपर्यंत द्वारकासह शहरातील विविध भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रशासन तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर टँकर हटविण्यास यश आले. सुदैवाने टँकर मधील गॅस गळती न झाल्यामुळे कोणतीही मोठी हानी झाली नाही. सकाळपासून बघ्यांची या ठिकाणी मोठी गर्दी होती...

घरगुती गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची घटना गुरुवारी (ता.१७) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली अचानक रिक्षा समोर आल्याने टँकर चालकाने ब्रेक लावला असता टँकर यातील लॉक असलेली क्लीप तुटल्याने अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते.

घरगुती भारत गॅस पुरवठा करणारा टँकर क्रमांक एम. एच. ४३, बीजी ६९९ मुंबई चेंबूर येथील ए. जी. एस. कंपनीतून गॅस भरून नाशिकच्या सिन्नर एमआयडिसी येथे खाली करण्यास जात होता. पहाटे द्वारका चौकातून सिन्नरच्या दिशेने वळण घेत असताना अचानक ब्रेक लावल्याने टँकरला झटका लागून गॅस टँक आणि ट्रक ट्रॉली यांना जोडणारी क्लिप तुटल्याने टँकरचा तोल जाऊन रस्त्याच्या बाजूला टँकर पलटी झाला.

चालक जोहर अली खान(वय.४०,रा. कोटापूर जिल्हा प्रतापगड) थोडक्यात बचावला. काही वेळ चौकातील वाहतूकिवर परिणाम होऊन वाहतूक कोंडी झाली. भद्रकाली पोलीस यांना माहिती मिळताच त्यांनी अग्निशामक दलास माहिती कळवली अग्निशामक दल आणि पोलीस अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल होत बॅरेकेर्टिंग करण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही.

मोठी दुर्घटना टळलीअपघात होऊनही गॅस टँकरला गळती झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. शिवाय अन्य कुठल्या प्रकारचा परिणाम झाला नाही. पोलीस आणि अग्निशामक दलाकडून गॅस कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्यात आला.

भारत पेट्रोलियम कंपनीचे सिन्नर येथून पथक घटनास्थळी दाखल होवून क्रेनच्या सहाय्याने टँकर रस्त्यातून हटवण्याचे काम पूर्ण करण्यात आले. गॅस टँकर पलटी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु टँकरला कुठल्याही प्रकारची गळती झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com