नाशिकच्या वेशीवरच नाट्य कलाकारावर गोळीबार; वाडीवऱ्हे पोलिसांत गुन्हा

नाशिकच्या वेशीवरच नाट्य कलाकारावर गोळीबार; वाडीवऱ्हे पोलिसांत गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकच्या नाटक कलाकारावर मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अज्ञात युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील नंदकिशोर दंडगव्हाळ असे या नाटक कलाकाराचे नाव आहे.

याप्रकरणी दंडगव्हाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दंडगव्हाळ हे नाशिकमधील कॉलेज रोड परिसरात कुटुंबासमवेत राहतात. ते नाटक कलाकारीसोबतच जमीन खरेदी विक्रीचा व्यवसायदेखील करतात.

काल (दि २५) रोजी जमिनीच्या व्यवहारासंदर्भात ते ठाणे येथे त्यांच्या मित्राची कार घेऊन गेले होते. यानंतर काम आटोपून ते रात्री नऊ वाजता मुंबईहून नाशिककडे परतीच्या प्रवासासाठी निघाले होते.

पडघ्याजवळील सिद्धुचा धाबा याठिकाणी त्यांनी साडेदहाच्या सुमारास फ्रुट सलाड घेतले. त्यानंतर तिथून ते नाशिककडे यायला निघाले. नाशिक मधील रायगडनगर परिसरातील करिश्मा हॉटेल येथे ते साडेबारा वाजता जेवणासाठी थांबले होते. दरम्यान, एक वाजेच्या सुमारास ते याठीकाणाहून घराकडे यायला निघाले.

हॉटेलपासून एक किमी अंतरावर आल्यानंतर नाशिक शहरात गाडी घेत असताना उजव्या बाजूकडून एक भरधाव दुचाकीवर दोघेजण आले. त्यांच्यापैकी मागे बसलेल्या एका व्यक्तीने बंदूक रोखत गोळी गाडीच्या दिशेने गोळी मारली.

प्रसंगावधान राखत दंडगव्हाळ यांनी गाडीच्या खाली मान करत गोळी चुकवली. यानंतर दंडगव्हाळ यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीला किरकोळ अपघात झाला होता.

घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तिथून गाडी पुन्हा रायगडनगरच्या दिशेने नेली. यानंतर जवळच असलेल्या एका हॉटेलवर गाडी थांबवत आसरा घेतला. यानंतर याठिकाणी दंडगव्हाळ यांनी त्यांचा आतेभाऊ केशव पोतदार यास बोलवून घेत घडलेला प्रकार सांगितला. आज सकाळी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाडीवऱ्हे पोलीस करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com