नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहराच्या पेशवेकालीन व ब्रिटीश राजवटीतील इतिहासाचा साक्षीदार असलेल्या सरकारवाडा या जतन वास्तूला लागून असलेल्या बोहोरपट्टी भागात रस्त्यावर बसणारे व हातगाडी लावणार्या विक्रेत्यांमुळे मोठे अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणामुळे वाहतूककोंडी निर्माण झाली असुन दुचाकी चालविणे अवघड झाले आहे. या प्रकारांकडे महापालिका अतिक्रमण विभाग हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या भागातील व्यावसायिकांनी केला आहे...

नाशिक शहरातील सर्वात गजबजलेली बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा लागून असलेल्या बोहोरपट्टी व सराफ बाजार याभागात अलिकडच्या काळात पुन्हा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. यात सराफ बाजारात असलेल्या फूल बाजाराचा मोठा त्रास सराफ व्यावसायिकांना झाल्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने फूलबाजार हा गणेशवाडी भाजी मार्केट याठिकाणी स्थलांतर करण्यात यश आले आहे.

मात्र बोहोरपट्टी भागात असलेल्या भाजीपाल्यासह इतर विक्रेत्यांनी रस्त्यावरच जागा अडविल्यामुळे या भागातील व्यावसायिकांना मोठा त्रास होत असून यामुळे वाहतूककोंडी होऊन नागरिकांना पायी चालणे अवघड झाले आहे. तसेच याठिकाणी होणार्या वाहतूककोंडीत दुचाकीस्वारांना चालणे अवघड झाले आहे. याभागात मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रेत्या महिलांची संख्या मोठी आहे. तसेच याच भागात असलेल्या मसाला व इतर व्यावसायिकांना दुसरीकडे जागा देण्यासंदर्भात निर्णय झाला होता.

मात्र हे विक्रेते अद्यापही गेलेले नसल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. ऐतिहासिक वास्तू असलेल्या सरकारवाड्याला या विक्रेत्यांचा मोठा विळखा पडला आहे. या संग्रहीत वास्तुला पाहण्यासाठी येणार्या पर्यटकांना याचा मोठा त्रास होत आहे. या प्रकाराकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.