
नाशिक | प्रतिनिधी
जगातील सर्वात लोकप्रिय व्हॉट्सअँपने नुकतेच त्यांच्या धोरणात काही बदल केले आहेत. ८ फेब्रुवारीपर्यंत या अटी स्वीकारणं युजरसाठी अनिवार्य आहे, जर अटी स्वीकारल्या नाहीत तर ८ फेब्रुवारीनंतर हे अॅप युजर्सला वापरता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे...
व्हॉट्सअॅपच्या या कृतीमुळे अनेक ठिकाणी युजर्स पर्याय शोधताना दिसून येत आहेत. यामुळे टेलिग्रामचे दोन कोटी युजर्स वाढल्याचे दिसून येते आहे. तर सिग्नल नावाचे जे नवे मेसेंजर आले आहे तेदेखील अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये इंस्टाल करून ठेवले आहे.
व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांच्या माहितीचे संकलन आणि प्रक्रिया. या बदलानुसार व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या मोबाइलमधील बॅटरीची सद्यस्थिती, नेटवर्क सिग्नल, मोबाइल क्रमांक, आयपी अॅड्रेस, मोबाइल कंपनी, भाषा आणि कालक्षेत्र (टाइमझोन) अशी सगळी माहिती व्हॉट्सअॅपला वेळोवेळी गोळा करता येणार आहे.
तसेच ‘व्हॉट्सअॅपवरील बिझनेस खाती त्यांच्या व्हॉटसअॅप चॅटमधील माहिती फेसबुकशी संबंधित अन्य खात्यांशी शेअर करू शकतील’. हा बदल वरकरणी केवळ व्हॉट्सअॅपवरून व्यवसाय करणाऱ्यांपुरता मर्यादित वाटत असला तरी, त्याचा थेट परिणाम सामान्य वापरकर्त्यांवर होणार आहे.
जर युजर्स व्हॉट्सअॅपवरून एखाद्या बिझनेस गटाशी (ग्रुप) संलग्न असाल तर तुम्ही त्या ग्रुपवरून शेअर केलेली माहिती किंवा तुमची माहिती कशी वापरायची आणि कुणाशी शेअर करायची याचा अधिकार संबंधित बिझनेस खात्याला असणार आहे. त्यामुळे याठिकाणी गोपनीयता भंग होईल असे म्हटले आहे.
पाहूयात व्हॉट्सअॅपच्या नव्या धोरणांवर नाशिकमधील सायबर एक्स्पर्ट नेमके काय म्हणतात.