नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात कोवीडमुळे चालू सप्ताहाच्या पहिल्याच तीन दिवसात जिल्ह्यात तब्बल ३७ मृत्यू झाले आहे.यापैकी मृतांमध्ये ग्रामीण भागातील रूग्णांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.जिल्ह्यात केवळ मृतांची संख्याच वाढत नसून त्यासोबतच एकूण रूग्णसंख्येत देखील वाढ होत आहे. त्यामुळे गत वर्षभरापासूनचा सुमारे २.३ टक्क्यांवर असणारा मृत्यूदर हा स्थिरच असल्याचा निर्वाळा आरोग्या अधिकाऱ्यांनी दिला आहे...

आठवड्याच्या सुरूवातीस २१ मार्चपासून २३ मार्चपर्यंत जिल्ह्यात कोवीडमुळे मृत पावलेल्या रूग्णांची संख्या तीन दिवसात ३७ नोंदविण्यात आली. यामध्ये ३७ पैकी २१ रूग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. अलिकडील अहवालातील माहितीच्या विश्लेषणानुसार एकाच दिवसामध्ये ग्रामीण भागात साधारणत: तीन ते पाच या संख्येच्या दरम्यान मृत रूग्णांची नोंद होत होती.

दि.२१ ते २३ मार्च दरम्यान मृतांची संख्या चढत्या क्रमाने नोंदविली गेली आहे. २२ आणि २३ मार्च रोजी दिवसाखेरीस नऊ इतकी मृतांची संख्या दोन्ही दिवस नोंदविली गेली. यामुळे कोवीड बाधीतांचा मृत्यूदर वाढत असल्याचा निष्कर्ष्प आरोग्य अधिकाऱ्यांनी नाकारला आहे.

एकीकडे मृतांची संख्या वाढत असली तरीही एकूण रूग्णांच्या संख्येतही दिवसाकाठी लक्षणीय भर पडते आहे. कोवीड मृतांचा मृत्यूदर काढताना एकूण रूग्णसंख्याही विचारात घ्यावी लागते. यानुसार गत वर्षभरापासून २.३ टक्के इतका असणारा मृत्यूदर हा अद्यापपर्यंत स्थिर असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर यांनी सांगितले.

कंटेन्मेंट झोनमध्ये चाचण्या वाढविल्या

बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे उपलब्ध अहवालानुसार जिल्ह्यात निफाड, देवळा, नांदगांव, नाशिक, चांदवड, सिन्नर, दिंडोरी व मालेगांव ग्रामीण या भागातील रूग्णसंख्या लक्षणीय असून ती झपाट्याने वाढते आहे. निफाडमध्ये सद्यस्थितीत ६८८ रूग्ण, मालेगांव ग्रामीणमध्ये ४३३ रूग्ण तर नांदगांवमध्ये ६५८ पॉझिटीव्ह रूग्ण उपचार घेत आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नांदगांव-मनमाड भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. कंटेन्मेंट झोनमधील नागरीकांच्या चाचण्यांवर भर देण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सांगितले. याशिवाय कुठल्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या रूग्णांची संख्या देखील वाढत असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यात चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली असून दुसरीकडे कोवीडबाधित मृतांची संख्या वाढणे हे चिंताजनक असले तरीही एकूण रूग्णांच्या संख्येतही भर पडते आहे. सरासरी मृत्यूदर २.३ टक्के हा वर्षभरापासून स्थिर आहे. नागरीकांनीही सर्वतोपरी काळजी घ्यायला हवी.
- डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद