Video : नाशिकमधील लॉकडाऊन शिथिल; सोमवारपासून उद्योगधंद्यांसह बाजारसमित्या होणार सुरु

राज्य शासनाचे निर्बंध राहणार कायम
Video : नाशिकमधील लॉकडाऊन शिथिल; सोमवारपासून उद्योगधंद्यांसह बाजारसमित्या होणार सुरु
Suraj Mandhare Collector Nashik

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हाप्रशासनाने लावलेला कडक लाॅकडाऊन रविवारी मध्यरात्रीपासून शिथील केला जाणार असून सोमवारपासून (दि.२४) अटीशर्तींसह उद्योगधंदे व बाजारसमित्या सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राज्य शासनाने १ जूनपर्यंत लागू केलेला लाॅकडाऊन कायम राहणार असून नागरिकांनी त्याचे पालन करावे. मोठ्या प्रयत्नांनी रुग्णसंख्या कमी झाली आहे. लाॅकडाऊन पूर्ण उठला हा गैरसमज बाळगून नियमांचे उल्लंघन करु नका,असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे...

लाॅकडाऊन उठविण्यात आला असा गैरसमज जनमानसात पहायला मिळत असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मांढरे यांनी शनिवारी (दि.२२) व्हिडिअोद्वारे नाशिककरांना संदेश दिला. नाशिक शहर व जिल्ह्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता राज्य शासनाने जारी केलेल्या निर्बंधा व्यतिरिक्त मागील १२ मे पासून जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन लागू केला होता.

त्यानंतर रुग्ण संख्या चांगल्यापैकी नियंत्रणात आलेली आहे. यामुळे स्थानिक स्तरावर कठोर केलेले निर्बंध दिनांक रविवारि (दि.२३) मध्यरात्रीपासून शिथिल करत असल्याचा निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतला.परंतू लाॅकडाऊन पूर्ण उठला अशा आशयाचे मॅसेज सोशल मीडियावर फिरत असून नागरिकांमध्ये गैरसमज होत आहे.

जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर लागू केलेला कडक लाॅकडाऊन शिथिल केला जात असला तरी शासनाने १ जून पर्यंत लागू केलेले निर्बंध जिल्ह्यासाठी जसेच्या तसे लागू असतील, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. अधिसूचनेनुसार लागू होते ते निर्बंध तसेच पुढे चालू राहणार आहेत.

त्याआधी सूचनेची प्रभावी अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर केली जाणार आहे. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातून पूर्ण लॉक डाऊन उठला आहे अशा गैरसमजात कोणी राहू नये. सर्वांनी पूर्वीच्या सर्व निर्बंधांचे यथोचित पालन करावे. मोठ्या प्रयत्नांनी रुग्ण संख्या कमी केली आहे. परंतु आता पुन्हा निर्बंधांचे उल्लंघन केल्यास ती वाढायला वेळ लागणार नाही याची जाणीव ठेवून सर्वांनी निर्बंधांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन त्यांनी नाशिककरांना केले आहे.

१६ हजार सक्रीय रुग्णसंख्या

लाॅकडाऊनमुळे करोना बाधित रुग्णांचा आकडा खालावला असला तरी सद्यस्थितीत जिल्ह्यात १६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.गतवर्षी करोनाच्या पहिल्या लाटेत ऐवढी सर्वोच्च रुग्णसंख्या होती. त्यामुळे अजूनही धोका टळलेला नसून नागरिकांनी राज्य शासनाने जारी केलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.

लाॅकडाऊन शिथीलमुळे हे राहणार सुरु

- उद्योगधंदे होणार सुरु

- जिल्हयातील सर्व बाजार समित्या होणार सुरु

- भाजीपाला सकाळी ७ ते ११ विक्री करता येणार. मात्र भाजी मार्केट बंद

- किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ सुरु

- दूध विक्री सुरु

- पाच लोकांच्या उपस्थितीत नोंदणी पध्दतिने विवाह करता येईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com