उद्या दिसणार रक्तवर्णी महाचंद्र!

उद्या दिसणार रक्तवर्णी महाचंद्र!

नाशिक | प्रतिनिधी

उद्या वैशाख पौर्णिमा! आज चंद्रग्रहण असले तरी आपल्याकडे उपछाया चंद्रग्रहण आहे. भारतामधून ते दिसणार नाही. पण आपल्याला सुपर मून दिसेल. ग्रहण असल्याने चंद्र लालसर रंगाचा दिसेल. म्हणून याला सुपर ब्लड मून असेही म्हणतात...

आपण त्याला रक्तवर्णी महाचंद्र म्हणू शकतो अशी माहिती खगोलशास्त्राच्या अभ्यासक सुजाता बाबर यांनी दिली. आज चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळच्या अंतरावर असेल. चंद्राची भ्रमण कक्षा पूर्ण गोलाकार नसून ती लांबगोलाकार आहे.

त्यामुळे चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर बदलत असते. पौर्णिमेला चंद्र जर पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल तर त्याला सुपर मून म्हणतात. आज (२६ मे) चंद्र पृथ्वीपासून ३५७४६३ किलोमीटर इतक्या अंतरावर असणार आहे.

तो जवळ असल्याने तो नेहमीच्या दृश्य आकारमानापेक्षा ७% मोठा आणि अत्यंत तेजस्वी दिसेल असेही त्यांनी सांगितले. आज चंद्रग्रहणही आहे. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र! चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही.

त्यावर पडलेला सूर्यप्रकाश परावर्तित होऊन आपल्याला चंद्र प्रकाशित दिसतो. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करीत असतो आणि ज्या दिवशी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते त्यास्थितीला आपण पौर्णिमा म्हणतो.

पौर्णिमा स्थितीमध्ये चंद्राच्या पृथ्वीच्या समोरील संपूर्ण पृष्ठभागावर सूर्यकिरण पडल्यामुळे आपल्याला प्रकाशित गोल चंद्रबिंब दिसते. ज्या पौर्णिमेला चंद्र, पृथ्वी आणि सूर्य अनुक्रमे एका रेषेत येतात तेव्हा आपल्याला चंद्रग्रहण दिसते.

आज देखील चंद्रग्रहण आहे. आपल्याकडे उपछाया चंद्रग्रहण आहे. पृथ्वीच्या प्रत्यक्ष सावलीत चंद्र प्रवेश करीत नाही तेव्हा त्याला उपछाया चंद्रग्रहण म्हणतात. यात चंद्र पूर्णपणे अदृश्य न होता अस्पष्ट दिसतो. भारतामधून ग्रहण दिसणार नाही कारण ते भर दुपारी आहे.

भारतामध्ये चंद्रग्रहणाचे वेध दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी लागतील व संध्याकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी संपतील.

प्रत्यक्ष ग्रहण मात्र दुपारी ४ वाजून ३९ मिनिटांनी सुरु होऊन ४ वाजून ५८ मिनिटांनी संपेल. नाशिकमध्ये ग्रहण संध्याकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी सुरु होईल, त्याचा सर्वोच्च बिंदू ७ वाजून १३ मिनिटांनी आहे व ७ वाजून १९ मिनिटांनी ग्रहण संपेल.

म्हणजेच ते अगदी थोडा वेळ, केवळ ८ मिनिटांचे आहे शिवाय सूर्यास्ताच्या नंतर लगेचच असल्याने चंद्र क्षितिजाखाली असणार आहे. त्यामुळे दिसण्याची शक्यता नाही.

हे ग्रहण वायव्य अमेरिका, दक्षिणेकडील आणि नैऋत्य अमेरिकेचा वरचा भाग, पॅसिफिक
महासागर, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिणपूर्व आशिया येथून हे ग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण विशेष आहे. कारण याचा कालावधी अगदी लहान आहे.

केवळ १५ मिनिटे! प्रत्येक पौर्णिमेला मात्र चंद्रग्रहण दिसत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे चंद्राचे भ्रमणकक्षेचे प्रतल आणि आयनिक वृत्त म्हणजे सूर्याचा भासमान मार्ग यांच्या प्रतलांमध्ये साधारण सव्वा पाच अंशाचा (५.० ९’) कोन आहे.

ही दोन्ही प्रतले एकमेकांना दोन ठिकाणी छेदतात या दोन बिंदूंना पात असे म्हणतात. यांनाच आपण राहू व केतू असेही म्हणतो. त्यामुळे जरी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आले तरी दरवेळी एका प्रतलात येत नाहीत.

याचमुळे सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आले की चंद्रग्रहण होते. सूर्यप्रकाशामुळे पडणारी पृथ्वीची सावली दोन प्रकारची असते.

एक म्हणजे प्रच्छाया (गडद छाया) व दुसरी उपच्छाया (विरळ छाया). प्रच्छाया ही सावलीच्या मध्यभागी व उपच्छाया प्रच्छायेच्या भोवती असते.चंद्रग्रहणामध्ये चंद्र पृथ्वीच्या ज्या छायेमध्ये दिसतो त्यावरून चंद्रग्रहणाचे प्रकार असतात.

या दोन्ही सावलींचा व्यास हा चंद्रबिंबाच्या व्यासापेक्षा अधिक आहे. संपूर्ण चंद्रबिंब कोणत्याही सावलीत सापडू शकते. चंद्र पातबिंदूपासून अधिक दूर असेल तर तो फक्त विरळ सावलीतूनच पसार होतो.

या चंद्रग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. विरळ छायेत दूर असल्याने हे ग्रहण डोळ्यांना फारसे जाणवत नाही. चंद्र पूर्णपणे गडद छायेमध्ये आला तर खग्रास चंद्रग्रहण दिसते. चंद्राचा अर्धा भाग जर विरळ छायेत असेल आणि अर्धा भाग जर गडद छायेत असेल तर खंडग्रास चंद्रग्रहण दिसते.

ग्रहणे ही पूर्णपणे वैज्ञानिक आणि खगोलीय घटना आहे. अनिष्ट परिणाम किंवा संकटे यांच्याशी याचा काहीही संबंध नाही. निसर्गाचा एक भाग आहे आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा याचा सर्वांनी आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता बाबर यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com