कोट्यावधी रुपयांची मशिन्स बिटकोत धूळखात

कोट्यावधी रुपयांची मशिन्स बिटकोत धूळखात
USER

नाशिकरोड | प्रतिनिधी

महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको करोना रुग्णालयात कोट्यावधी रुपये खर्च करुन खरेदी केलेली मशिन्स तज्ञ आणि साहित्या अभावी बंद असल्यामुळे रुग्णांचे प्राण धोक्यात आले आहे. वैद्यकीय यंत्रणाही हतबल झाली आहे. मृत्यूदर वाढतच चालला आहे. आयुक्तांनी तातडीने ही समस्या सोडविण्याची गरज आहे...

बिटकोत छातीसाठी एचआर सीटी मशिन तसेच एमआरआय व स्कॅन हे तीन महत्वाचे मशिन बसविण्यात आले आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपये मोजण्यात आले आहेत. एचआरसीटी सुरु आहे.

तथापी, फिल्मच आलेली नसल्यामुळे अनेक दिवसांपासून ते बंद आहे. त्यामुळे रुग्णांना अजूनही एचआर सिटी करण्यासाठी बाहेर जावे लागत आहे. अन्य मशिन चालविण्यासाठी तज्ञच दाखल झालेले नाही.

रुग्णांचा महत्वाचा वेळ वाया जाऊन त्यांचे प्राण धोक्यात येत आहेत. त्यामुळे हे मशीन्स लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. व्हेन्टीलेटर दुरुस्तीसाठी आता इंजिनियर दाखल झाला आहे.

नगरसेवक जगदीश पवार यांनी सांगितले की, रुग्णांचा मृत्यू झाल्यावर मशिन्स सुरु करुन काहीच उपयोग नाही. ही मशीन्स लवकर कार्यान्वित झाल्यास रुग्णांना बाहेर जावे लागणार नाही.

नाममात्र शुल्कामध्ये या ठिकाणी एचआरसिटी तपासणी होईल. बिटको रुग्णालयात करोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. खासगी रुग्णालयात एचआरएस सिटी करण्यासाठी अडीच हजार रुपये खर्च येतो.

बिटको रुग्णालयात मशीन असूनही त्याचा काहीच उपयोग होत नाही. हे मशीन त्वरित कार्यान्वित झाल्यास गरीब रुग्णांचा वेळ व पैसा वाचेल. महत्वाचे म्हणजे त्यांचे लाखमोलाचे प्राण वाचतील. महापालिका आयुक्तांनी याप्रश्नी तातडीने लक्ष घालून हे मशीन विनाविलंब कार्यान्वित करण्याचे निर्देश द्यावेत.

रुग्णाचा मृत्यू झाल्यास डेथ फॉर्म भरुन द्यावा लागतो. रुग्ण बरा झाल्यास डिस्चार्ज कार्ड भरुन द्यावे लागते. या दोन्हींची टंचाई आहे. रुग्णांना रात्री-अपरात्री फॉर्मची झेरॉक्स काढून आणण्यास सांगितले जाते.

लॉकडाउनमुळे बाहेर दुकाने बंद असल्याने नातेवाईकांचे हाल होतात. मृतदेह लवकर ताब्यात मिळत नाही. त्यातून वाद वाढत आहेत. अशा किरकोळ समस्या महापालिकेने त्वरित सोडविल्यास सर्वांवरील ताण कमी होणार आहे. मनोधैर्य खचणार नाही. महापालिकेने पथक पाठवून बिटकोच्या समस्या कायमच्या सोडवाव्यात अशी मागणी आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com