नाशिक | प्रतिनिधी

द्वारका परिसरात मध्यरात्री उसळलेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पाच दंगलखोरांना भद्रकाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दंगलीत चाकूसह चॉपरचा वापर झाल्यामुळे जुन्या नाशकातील गुन्हेगारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

अधिक माहिती अशी की, द्वारका परिसरातील वडाळा नाका परिसरातील महालक्ष्मी चाळीत रात्री 11 वाजेच्या सुमारास दंगल झाली. यावेळी चाकू व चॉपरसारख्या हत्यारांचा वार देखील झाला.

या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी असल्याचे समजते. घटनेची माहिती कळताच भद्रकाली पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाच जणांना ताब्यात घेतले.

वडाळा नाका येथील महालक्ष्मी चाळ येथे रात्री 11 वाजेच्या सुमारास दोन गटांत भांडण सुरू झाले. यावेळी संशयित विशाल बेनवाल व त्याच्या साथीदारांनी गैरकायद्याची मंडळी जमवून करण राजू लोट व आकाश संतोष रंजवे यांना तू पोलिसांना टीप देतो या कारणावरून वादंग सुरु झाले.

यावेळी संशयित विशाल बेनवाल, सतीश टाक, पवन टाक, आकाश टाक, निखिल टाक, अभय बेनवाल, हरिष पवार, मनीष दुलगज व शिवम् पवार हे त्या ठिकाणी जमा झाले. वाल्मीकी मंदिराजवळ या संशयितांनी शिवीगाळ करत हातात चाकू व चॉपरसारखी हत्यारे घेऊन समोरच्यांच्या अंगावर धावले. यावेळी आकाश संतोष रंजवे याच्यावर चाकू व चॉपरसारख्या हत्याराने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात करण लोट याच्या पाठीवर हत्याराचा वार बसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने तणाव निवळला असून, अधिक तपास सुरू आहे.