मदतीच्या बहाण्याने केली हातचलाखी
नाशिक

मदतीच्या बहाण्याने केली हातचलाखी

भामट्याने एटीएम बदलून काढले साठ हजार

Vilas Patil

Vilas Patil

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

सिन्नर बसस्थानकासमोरील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या ग्राहकाचे पैसे भरण्यास मदत करण्याच्या बहाण्याने अज्ञात भामट्याने ग्राहकाच्या खात्यातील साठ हजार रुपये काढून घेतल्याची घटना 10 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 च्या दरम्यान घडली.

वावी वेस भागातील सुभ्रता सुसांता बिस्वास (30) हे दुपारी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांच्या खात्यावर पैसे भरले जात नव्हते. अनेकदा प्रयत्न करुनही पैसे भरले गेले नाहीत.

हे सर्व एटीएममध्येच उभा असलेला दुसरा ग्राहक बघत होता. त्याने पैसे भरण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करुन बिस्वास यांच्याकडून त्यांचे एटीएम कार्ड घेतले व मी तुमचे पैसे तुमच्या खात्यात भरतो असे म्हणत त्यांचा पिनकोड नंबर विचारला.

बिस्वास यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत त्या भामट्याकडे आपले एटीएम कार्ड दिले व रोख 37 हजार रुपयेदेखील विश्वासाने त्याच्याकडे सोपवले. हे पैसे त्याने त्यांच्या खात्यात भरले. मात्र, एटीएम कार्ड परत देताना हात चलाखी करत दुसरेच कार्ड बिस्वास यांच्याकडे सोपवत भामटा निघून गेला.

मात्र, कार्ड बदलल्याचे विश्वास यांच्या लक्षात आले नाही. या भामट्याने नंतर बिस्वास यांच्या कार्डचा वापर करुन त्यांच्या खात्यावरील 60 हजार रुपये काढून घेतले. पैसे न काढता पैसे काढल्याचा मेसेज मोबाईलवर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे बिस्वास यांच्या लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी आपल्याकडील एटीएम कार्ड तपासले असता ते दुसऱ्याचेच असल्याचे स्पष्ट झाले. नंतर बिस्वास यांनी भामट्याचा सर्वत्र शोध घेतला.

मात्र, तो कुठेही सापडला नाही. त्यामूळे सिन्नर पोलीस ठाण्यात जावून 14 ऑगस्टला बिस्वास यांनी अज्ञात भामट्याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास हवालदार गणेश परदेशी करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com