नाशिक । प्रतिनिधी

नाशकात प्रथमच अपोलो हॉस्पिटल्समध्ये अवघ्या 9 वर्षाच्या बालकावर किडनी प्रत्यारोपण करण्यात डॉक्टरांना यश आले असल्याची माहिती अपोलोचे किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मोहन पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे...

यशराज असे या 9 वर्षीय बालकाचे नाव आहे आहे. या बालकाची प्रकृती उत्तम असून त्याला त्याच्या 57 वर्षाच्या आजीनेच किडनी दान केली आहे. आजीचीही प्रकृती ठिक

अवघे 9 वर्षाच्या यशराजच्या गेल्या एक वर्षापासून दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे त्याचे डायलिसिस सुरू होते. त्याच्या रक्तवाहिन्या लहान असल्याने फिशुला करणे शक्य नव्हते, त्यामुळे कॅथेटरमधून डायलिसिस सुरू होते. त्याच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अत्यंत आवश्यक होती. अशावेळी यशच्या आई-वडिलांनी किडनी दान करण्याची तयारी दर्शविली. पण त्यांच्या तपासणी केल्यानंतर दोघेही किडनी दान करण्यास तंदुरुस्त नसल्याचे समोर आले. अशा वेळी यशच्या आजीने किडनी दान करण्याचा निर्णय घेतला व यशला पुनर्जन्म प्राप्त झाला.

लहान मुलांवर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होत नाही हा समाजात गैरसमज असल्याचे युरोसर्जन डॉ. किशोर वाणी यांनी सांगितले. डॉ. प्रवीण गोवर्धने म्हणाले की, लहान मुलांमध्ये लघवीचा मार्ग छोटा असतो आणि प्रत्यारोपणाद्वारे बसविण्यात येणारी किडनी आकाराने मोठी असल्याने तिला जास्त जागा लागते. त्यामुळे प्रत्यारोपण करताना खूप जास्त काळजी घ्यावी लागते. अपोलोचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रसाद मुगळीकर यांनी अपोलो हॉस्पिटलमध्ये अवघ्या 4 वर्षांत 60 रुग्णांवर यशस्वीपणे किडनी प्रत्यारोपण करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी डॉ. प्रवीण गोवर्धने, डॉ. मिलिंद शाह, डॉ. अभयसिंग वालिया, डॉ. प्रकाश उगले, डॉ. चेतन भंडारे, चारूशीला जाधव, डॉ. मंगेश जाधव, कैवल्य सोहनी उपस्थित होते