नाशिक । प्रतिनिधी

राज्यासह जिल्हयातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बाधीतांची संख्या वाढत असल्याने निर्बंध कडक होत आहे. रूग्णांची संख्या कमी झाल्याने बंद केलेले जिल्हयातील कोव्हीड सेंटर पुन्हा कार्यन्वीत करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिले आहे. जिल्हयातील सर्व १८ कोव्हिड केअर सेंटर पुन्हा सुरू होणार आहेत.तसेच करोेना चाचण्यांची संख्या वाढवण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत...

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्हयात १८ ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर उभारले होते. मात्र, रुग्णांची संख्या घटल्यानंतर टप्प्या टप्प्याने हे सेंटर बंद केले होते. मागील स्थायी समिती सभेत तर या उपचार केंद्रांमधील साहित्य प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे हस्तांतरित करण्याबाबत आरोग्य विभागाला सूचनाही देण्यात आल्या होत्या.

मात्र, गेल्या आठवडयापासून राज्यासह जिल्हयातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. यामुळे जि.प. आरोग्य विभाग पुन्हा खडबडून जागे झाले आहे.

कोरोना बाधीतांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर आता ही कोव्हीड सेंटर पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.

नागरिकांना चाचण्या करणे सोयीचे व्हावे यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना चाचणी घेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती डॉ. कपिल आहेर यांनी दिली.

बाधितांशी आलेला संपर्क आणि लक्षण यावर रॅपिड टेस्ट, आरटीपीसीआर चाचण्या घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कोरोना बाधीत रुग्णांशी संपर्क आलेल्या तसेच लक्षणे असलेल्या नागरिकांनी चाचण्या करून घ्याव्यात, अशा सूचना डॉ. आहेर यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेतही निर्बंध कडक

जिल्हा परिषदेच्या मुख्यलयातील सैल करण्यात आलेले कोरोनाचे निर्बंध पुन्हा कडक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मुख्यालयात प्रवेश करतांना तपासणी केली जाणार आहे. तापमान असलेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही.

गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने नियमावली तयार केली आहे. कर्मचारी संख्येबाबत कोणत्याही सूचना नसल्याने कर्मचाºयांची संख्या कमी केली जाणार नाही. मात्र, विभागात गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. पदाधिकारी, सदस्यांनाही आपल्या कार्यकर्त्यांची गर्दी करू नये असे सांगितले आहे.