नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात करोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज जिल्ह्याभरात एकूण ४२४ रुग्णांची वाढ झाली असून दोन रुग्णांचा करोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर २४३ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्णवाढ होत असल्यामुळे आतापर्यंत नाशिक शहरात ४५२ ठिकाणे प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आले आहेत...

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत करोनाची लाट बघायला मिळाल्यानंतर नाशिकमध्येही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री पोलिसांकडून ठिकठिकाणी तपासणी सुरु आहेत. त्यातून नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी समजदेखील दिली जात आहे.

आज नाशिक जिल्ह्यात वाढलेले सर्वाधिक रुग्ण हे नाशिक महापालिकेच्या आवारातील आहेत. तब्बल २६० रुग्ण आज येथे आढळून आले आहेत. त्या पाठोपाठ नाशिक ग्रामीणमध्येही आज रुग्णांचा आकडा वाढला असून १३१ रुग्ण आज याठिकाणी आढळून आले आहेत.

मालेगाव महापालिका क्षेत्रातदेखील २५ रुग्णांची भर पडली आहे. तर जिल्हा बाह्य ८ रुग्ण वाढलेले आहेत.

आज दोन रुग्णांचा करोना संसर्गाने मृत्यूदेखील झाला असून एक रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रातील तर दुसरा रुग्ण नाशिक ग्रामीणमधील असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.