नाशिक | प्रतिनिधी

१५ वे विद्राेही साहित्य संमेलन नाशिकला हाेणार असून नुकत्याच झालेल्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत संमेलनाच्या मिरवणुकीत व संमेलनस्थळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकाची भव्य प्रतिमा उभी करण्याचा तसेच संमेलनात येणाऱ्या साहित्य प्रेमींना संविधानाच्या उद्देशिकेची प्रत द्यावी याबाबत निर्णय घेण्यात आले. भारतीय संविधानाच्या विविध घटकांचे प्रतिनिधित्व व अविष्कार संमेलनात असावेत या संदर्भात सूचना करण्यात आल्या...

संमेलनाची मूठभर धान्य व एक रुपया मोहीम नाशिक शहरात व जिल्ह्यात ठीक ठिकाणी राबविण्याची जबाबदारी व भारतीय संविधान प्रबोधन कार्यक्रम निश्चित करण्यात आले.

तसेच भारतीय संविधानाच्या विषयावर निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्र प्रदर्शन करण्याचा निर्णय झाला. तसेच आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारतीय संविधानाच्या विषयी परिसंवाद, गटचर्चा आयोजित करण्यात येणार आहे. संमेलनात विविध ठरावा विषयी चर्चा झाली व ठराव लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली.

सविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही साहित्य संमेलनाची सविधान प्रबोधन समिती बैठक संपन्न झाली. यात समितीच्या समन्वयकपदी शिवदास म्हसदे, प्रा. नारायण पाटील, विजय जगताप. अजमल खान, प्रल्हाद मिस्त्री यांची निवड करण्यात आली. बैठकीतचे प्रास्ताविक संमेलनाचे मुख्य संयोजक राजू देसले यांनी केले.

बैठकीत उपस्थित संस्था तसेच संमेलनाच्या प्रसार, प्रचाराच्या निमित्ताने महिला ट्रॅक्टर रॅलीचे नियोजन करण्यात येणार आहे.

तुळशीराम जाधव यांनी लिहिलेल्या हस्तलिखित राज्यघटना व दृष्टिक्षेपात भारताचे संविधान या पुस्तिकेच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन संमेलनात करण्यात येणार आहे. बैठकीस संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे, प्रभाकर धात्रक, किशोर ढमाले आदींनी मार्गदर्शन केले.