नाशिक मनपा निवडणूक : नवीन नाशिक विभागात  महिलांचे वर्चस्व राहणार

नाशिक मनपा निवडणूक : नवीन नाशिक विभागात महिलांचे वर्चस्व राहणार

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

ओबीसी आरक्षण ( OBC Reservation )जाहीर झाल्यानंतर नवीन नाशिक परिसरात पूर्वी दहा प्रभागातून 18 महिला व 12 पुरुष अशी संख्या होती मात्र ओबीसी आरक्षणाने त्यात फेरबदल होऊन 17 महिला 13 पुरुष असा बदल झाल्याने यंदा नवीन नाशकात ( New Nashik ) महिलांचे वर्चस्व राहणार असून प्रभाग 44 मधील दिगजांना घरातील महिलांना उमेदवारीसाठी उभे करावे लागणार आहे तर बाकीच्या ठिकाणी पुरुष मंडळी सेफ झोन मध्ये आली आहे.

नवीन नाशिक परिसरात प्रभाग 30,31,32,33,34,35,36,37,38,44 या दहा प्रभागांचा समावेश झाला आहे. ओबीसी आरक्षण सोडतीने प्रभाग 32 मध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक श्याम साबळे व 37 मधून शिवसेनेच्या माजी रत्नमाला राणे यांना धक्का बसण्याची दाट शक्यता वर्तविली जात असली तरी रत्नमाला राणे यांचे चिरंजीव भुषण राणे यांनी प्रभाग 37 मधून शिवसेनेकडून वर्णी लागण्याची शक्यता आहे.

प्रभाग 30 मध्ये अ गटात सर्वसाधारण महिला ऐवजी ओबीसी महिला असा बदल झाला असला तरी 2 महिला 1 पुरुष ही स्थिती जैसे थे अशी आहे. प्रभाग 31 मधिल 2 महिला 1 पुरुष ऐवजी 2 पुरुष 1 महिला असा बदल झाला असला तरी शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा बालेकिल्ला शाबीत राहिला आहे. प्रभाग 32 मध्ये महिला ओबीसी आरक्षण झाल्याने शिवसेनेचे माजी नगरसेवक व दादा भुसे यांचे समर्थक श्याम साबळे यांची अडचण होणार आहे.

प्रभाग 33 मध्ये सेने व भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल होण्याची शक्यता नसल्याची चिन्हे असली तरी शिवसेनेकडून माजी प्रभाग सभापती तथा माजी नगरसेविका सुवर्णा मटाले व हर्षदा गायकर यांच्या समवेत युवा सेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक दिपक दातीर यांना संधी मिळू शकते.

नवीन नाशिक व सातपूरचा दोन्ही परिसर मिळून एकत्रीत झालेल्या प्रभाग 34 मध्येही जैसे थे परिस्थिती असल्याने या प्रभागात बदल होण्याची शक्यता ना च्या बरोबर आहे. प्रभाग 35 मध्ये ब गटाला ओबीसी आरक्षण मिळाले आहे मात्र इच्छुकांना उमेदवारी बाबत किरकोळ बदल येथे संभावित आहेत.

प्रभाग 36 मध्ये पुरुषांची संख्या 1 ने वाढल्याने शिवसेना उपनेते सुनिल बागुल यांचे पुतणे अजय बागुल यांचे नवीन नाशकातून शिवसेनेची उमेदवारी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार याची शक्यता वाढली आहे.

याठिकाणी माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी हे देखील सेफ झोन मध्ये आले आहेत . सुरवातीपासूनच चर्चेत राहिलेल्या प्रभाग 37 मध्येही आधीच्या 1 पुरुष, 2 महिला ऐवजी 2 पुरुष, 1 महिला असा फेरबदल झाल्याने येथील भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे व शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव दिपक बडगुजर यांच्यातील संघर्ष आहे तसाच राहतो कि,आपापसात काही तडजोड होते याकडे संपूर्ण प्रभागाचे लक्ष लागून आहे.

भाजपाचेच माजी नगरसेवक राहिलेल्या मुकेश शहाणे व निलेश ठाकरे यांच्यातील तिकिटासाठीची स्पर्धाही ओबीसी आरक्षणाने संपुष्टात आली आहे. येथून राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी शिक्षक आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या पत्नी डॉ. योगिता हिरे यांच्या समवेत कृष्णा काळे, मुकेश शेवाळे, डॉ. संदिप मंडलेचा, हरीष महाजन, आदींपकी कोणाला संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

प्रभाग 38 मध्ये मात्र पूर्वीच्या 2 पुरुष व 1 महिला ऐवजी 1 पुरुष व 2 महिला असा बदल झाल्याने बहुसंख्य पुरुष इच्छुकांनी आपल्या घरातील महिलांना उमेदवारीसाठी सोशल मिडियावरून प्रसिध्दी सुरु केली आहे.

प्रभाग 44 मध्ये तर ओबीसी आरक्षणाने मातब्बर उमेदवारांवर घरातील महिलांना उमेदवारीसाठी पुढे आणल्याखेरीज पर्याय उरला नाही. हा प्रभाग तीन पैकी 2 महिला राखीव झाल्याने या प्रभागातून प्रबळ दावेदार इच्छुक असलेल्या माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांच्यासह अन्य पक्षांचे पदाधिकार्‍यांचा अपेक्षा भंग झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com