नाशिक मनपाची सिन्नरसाठी बससेवा

नाशिक मनपाची सिन्नरसाठी बससेवा

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

नाशिक महापालिकेच्या बससेवेच्या (Nashik NMC Bus Service) फेर्‍या सिन्नरला सुरू झाल्या आहेत. सीएनजीवर (CNG Bus) चालणार्‍या या आधुनिक 7 बसेसने तहसील कार्यालयासमोरुन सिन्नर ते नाशिक (Sinnar to Nashik) प्रवास नागरिकांना करता येणार आहे. प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी सिटीलिंक (Citilinc) या मोबाईल अ‍ॅपची सुविधा मनपाच्या बससेवेत आहे...

सकाळी 8.30 पासून रात्री 10 वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाने नाशिकला जाण्यासाठी ही बस सिन्नरकरांना उपलब्ध असणार आहे. 37 आसने असणारी ही बस तहसीलनंतर हॉटेल पंचवटीच्या बाहेरुन, आडव्या फाट्यावरुनही प्रवासी घेणार असून द्वारका, शालिमार, निमाणी बसस्थानकापर्यंत प्रवाशांना सोडणार आहे.

द्वारकेपासून निमाणीपर्यंत कुठेही 50 रुपयात प्रवास करता येणार आहे. नाशिकरोडसाठी 40 रुपये प्रवास भाडे घेतले जाणार आहे.परतीच्या प्रवासासाठी निमाणी बसस्थानक, शालिमार, द्वारका येथून प्रवाशांना ही बस उपलब्ध असेल. पुरेसे प्रवासी मिळेपर्यंत काही दिवस बस थोडा जादा वेळ तहसीलसमोर थांबणार आहे. त्यानंतर दर अर्ध्या तासाने प्रवासी मिळो ना मिळो बस नाशिककडे रवाना होणार आहे.

ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांसाठी एस.टी.च्या प्रवास भाड्यात सवलत असली तरी महापालिकेच्या या परिवहन सेवेत ही सवलत मिळणार नाही. फक्त अंध, अपंगासाठी असणारी अर्ध्या तिकीटाची सवलत प्रवाशांना मिळू शकणार असल्याची माहिती महापालिकेच्या परिवहन विभागाने सिन्नरसाठी खास नियुक्त केलेले वाहतूक नियंत्रक एम. जी. गुजराथी यांनी ‘दै.देशदूत’शी बोलतांना दिली.

महापालिकेने यापूर्वीच ओझर, सायखेडा, गिरणारेसाठी बससेवा सुरु केली असून याबससेवेप्रमाणेच सिन्नरलाही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. थेट विजयनगरमधून बसची फेरी सुरु झाल्याने बसस्थानकापर्यंत जाण्यासाठी रिक्षा अथवा अन्य वाहनांचा वापर करण्याची गरज प्रवाशांना पडणार नाही.

तहसील कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी येणार्‍यांना, न्यायालयात येणार्‍यांना, विविध शाळांमधील शिक्षकांना, पंचायत समिती, उपजिल्हा रुग्णालय, नगर परिषदेसह बँकामध्ये दररोज नाशिकहून ये-जा करणार्‍या अधिकारी-सेवकांना ही बससेवा फायद्याची ठरणार आहे. तहसिल समोर दिवसभर उभ्या दिसणार्‍या या बसेसकडे उत्सुकतेपोटी सिन्नरकर चौकशीसाठी जातांना दिसत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com