नाशिक होणार का पुन्हा मनसेनेचा बालेकिल्ला

नाशिक होणार का पुन्हा मनसेनेचा बालेकिल्ला

नाशिक | फारूक पठाण | Nasik

2012 ते 2017 या पाच वर्षाच्या काळात नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (Maharashtra Navnirman Sena) सत्ता होती. या काळात शहराचा विकास झाल्याचा दावा पक्षाचे पदाधिकारी करतात. याच दरम्यान कुंभमेळ्याचे (kumbhmela) यशस्वी आयोजन झाले....

रिंगरोडसह इतर रस्त्यांची कामे उत्तम दर्जाची झाल्याने त्यात खड्डे पडले नाही. तर विकास कामांमध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही, असा दावा मनसैनिक करतात. आता पक्षाने मिशन 2022 हाती घेतले असून युवा जोडो अभियान व मनसैनिक तिथे पक्षाचा झेंडा अभियानातून शहरात वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे.

सर्वकाही व्यवस्थित राहिले तर 2022 च्या दुसर्‍या महिन्यात नाशिक महापालिकेची सर्वात्रिक निवडणूक (NMC Election) होणार आहे. प्रशासनासह विविध पक्षांनी याची तयारी सुरू केली आहे. मनसेनेच्या सत्ताकाळातील विकासकामे 2017 च्या निवडणुकीत आम्ही जनतेपर्यंत पोहोचविण्यात कमी पडलो होतो.

ती चूक आता होणार नाही. कारण आमच्या नंतर भाजपच्या (BJP) सत्ताकाळाचे देखील 5 वर्ष नाशिककरांनी आता पहिले आहे. यात सांगण्यासारखे एकही काम नसल्याचा दावा मनसैनिक करतात. यामुळे आतापासूनच 2022 ची तयारी मनसेनेने सुरू केली आहे.

आगामी निवडणूक युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची चर्चा आहे. यामुळे गत काही महिन्यात त्यांचे अनेक दौरे नाशिकमध्ये झाले आहेत. तर त्यांच्यासह वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी मनसेनेच्या काळात झालेल्या कामांची पाहणी करुन त्याकडे विशेष देण्याची मागणी मनपा आयुक्त कैलास जाधव (Nashik Municipal Commissioner Kailas Jadhav) यांना भेटून केली आहे. यामुळे मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार होत आहे.

शाखाप्रमुख हा पक्षाचा कणा असतो, यामुळे नाशिक शहरात 122 वॉर्डप्रमाणे 122 शाखाप्रमुखांची नेमणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने होणार आहे. यासाठी युवा नेते अमित ठाकरे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांनी सुमारे साडेसातशे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 21 सप्टेंबर 2021 पासून तीन दिवस नाशिक दौर्‍यावर येणारे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थित शाखाप्रमुखांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे प्रत्येक मनसैनिकाच्या घरी पक्षाचा झेंडा लावण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पक्षाचे स्थनिक पातळीवरील वरिष्ठ अधिकारी जाऊन लोकांशी संवाद साधणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप दातीर (Dilip Datir), शहरप्रमुख अंकुश पवार, ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख, प्रदेश पदाधिकारी रतन कुमार इचम, मनोज घोडके, शाम गोहाळ, जावेद शेख आदींनी दिली आहे.

युवा जोडो अभियान

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी विभागाच्या वतीने विशेष युवा जोडो अभियान सुरु करण्यात आले आहे. अंतर्गत जिल्ह्यातील युवकांना संघटनेत सक्रिय सहभाग करुन घेण्यात येणार आहे. नोंदणी करणार्‍या युवकांचे नोकरीसह इतर अनेक प्रश्न या माध्यमातून सोडविले जाणार आहे.

होतकरु युवकांना सक्रिय राजकारणात आणण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. या अभियानासाठी विशेष मोबाईल अ‍ॅप (Mobile App) तयार करण्यात आले असून त्याचे बारकोड स्कॅन केल्यावर आतमध्ये माहिती भरण्यासाठी फॉर्म राहणार आहे.

यामध्ये युवक आपली संपूर्ण माहिती देऊ शकतात. त्याच प्रमाणे नोकरी, शिक्षण आदींबद्दल काही प्रश्न असले तर त्याची नोंद यामध्ये करता येणार आहे. याद्वारे मिळालेल्या माहितीची दखल पक्षाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे व विविध लहान मोठ्या कंपन्या आदी अस्थापना यांच्याशी चर्चा करुन नोकरीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शाम गोहाळ (Sham Gohal) यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com